बोटोणी येथिल जंगल परिसरातील घटना
सुरेश पाचभाई मारेगाव
मारेगाव तालुक्यातील बोटोणी गावाच्या सभोवती जंगल परिसराने वेढा घातलेला असून गावातील गुराखी जंगला शेजारी पशुधन चारण्यासाठी नियमित जात असतात.अशातच काल दिनांक ९ डिसेंबर २०२४ रोज सोमवारला गुराखी नेहमी प्रमाणे सकाळी १०:३० वाजताच्या सुमारास खैरगाव रस्त्या जवळील जाणबाच्या माळा शेजारी पशुधन सराईसाठी घेऊन गेले असता झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने एका गोऱ्यावर हल्ला करून ठार केल्याची घटना काल सायंकाळी उघडकीस आली आहे.
तर दुसऱ्या गोऱ्याच्या पाठीवर पंजा मारला व वगाराला पण जख्मी केले,असून वगार वाघाच्या भीतीने सैरावैरा होऊन पसार झाले की,वाघाने पस्त केले याचा थांगपत्ता लागला नाही.
अशी आपबीती गुराखी अरुण नागोसे यांनी दिली.बोटोणी जंगल हा अतिशय घनदाट असून अधून मधून जंगलाचा राजा वाघोबाचे दर्शन नित्यनेमाने होत असून अनेकदा जनावरांवर वाघाने हल्ला करून कधी ठार तर कधी जखमी केल्याचे दिसुन येत आहे.
गोसावी सखाराम मोहजे यांच्या मालकीचे अंदाजे दीड ते दोन वर्षीय गोऱ्यावर वाघाने हल्ला करून ठार केल्याने त्यांचे अंदाजे दहा हजार रुपयाचे नुकसान झाले आहे.बोटोनी परिसरात वाघाची धास्ती चांगलीच असून पशुधन पालकाचे झालेल्या नुकसानीचा मोबदला लवकरात लवकर मिळावा अशी मागणी होत आहे.
“प्रतिक्रिया”
बोटोनी परिसरामध्ये वाघाचे वावर व अस्तित्व आहे. एका गोऱ्यावर वाघाने हमला करून ठार केल्याची घटना काल घडली आहे.त्यामुळे नागरिकांनी जंगलात व शेतात जात असताना आवाज करत जावे. एकट्याने शेतात किंवा जंगलात जाऊ नये. एकट्याने शेतात जायचे झालेच तर आवाज करत जावे. सकाळी ८ वाजताच्या आधी शेतात व जंगलात कोणीही जाऊ नये. व सायंकाळी अंधार पडण्याआधी शेतातून व जंगलातून शेतकऱ्यांनी लवकर घरी यावे असे आवाहन शंकर हटकर वनपरिक्षेत्र अधिकारी मारेगाव यांनी केले आहे.