वणी – वरोरा महामार्गावरील घटना
दुचाकीस्वार तरुण मारेगाव येथील
तालुका प्रतिनिधी वणी
चंद्रपूर येथून बहिणीच्या गावावरून मारेगाव येथे दुचाकीने परत येत असतांना युवकाच्या दुचाकीला संविधान चौक येथे मालवाहू ट्रकने जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की यात या युवकाचा जागीच मृत्यू झाला.ही घटना दि. 5 फेब्रुवारीला सकाळी 10.30 च्या दरम्यान वणी – वरोरा रोडवरील संविधान चौक घडली. अपघातात मृत्यू पावलेल्या युवकाचे नाव गणेश हरिचंद्र बदकी वय अंदाजे 26 वर्ष रा.मारेगाव असे आहे.
गणेश हा चंद्रपूर येथे बहिणीची तब्येत बरी नसल्याने भेटायला गेला होता. बुधवारी दि. 5 तारखेला तो वरोरा मार्गे परत येत असतांना वणी वरोरा महामार्गावरील संविधान चौकात मालवाहू ट्रक क्र. CG 04 PH 0520 ने गणेशच्या दुचाकी क्र.MH 29 AB 1563 ला जोरदार धडक दिली.

ही धडक एवढी जोरदार होती की यात गणेशचा जागीच मृत्यू झाला.अपघात झाल्यानंतर वाहन चालक हा वाहनासह पोलिस स्टेशनमध्ये स्वतःहून हजर झाला. दुचाकी चालक गणेश बदकी हा मारेगाव येथील रहिवाशी होता.अपघाताची माहिती वणी पोलिसांना मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करीता वणी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.सदर घटनेचा प्राथमिक तपास जमादार संतोष आढाव करीत आहे. त्याच्या पश्चात आई-वडील व एक विवाहित बहीण आहे.