सत्कार कार्यक्रमात उत्तर देताना काढले उद्गार
सुरेश पाचभाई मारेगाव
व्यक्ती समाजात राहत असताना इतरांसोबत कसा वागतो हे महत्त्वाचे आहे.व्यक्तीच्या वागण्यावरच व्यक्तीचे समाजातील स्थान ठरल्या जाते.आज आपण सगळे एवढ्या मोठ्या प्रमाणात येथे एकत्र येऊन मला जो निरोप देत आहात हे खरोखरच आपल्या सगळ्यांचे प्रेम आहेत असे भावनिक उद्गार मार्डी येथील मुख्याध्यापक श्री विलास ताजने यांनी काढले.ते निरोप समारंभ प्रसंगी केलेल्या सपत्नीक सत्काराला उत्तर देताना बोलत होते.
यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री भास्करराव धानफुले होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून मार्डी येथील सरपंच रविराज चंदनखेडे, पोलीस पाटील डॉक्टर प्रशांत पाटील, दिवाकरराव पंडिले,सौ. पद्मावती ताजने,युवराज ताजने,ज्येष्ठ शिक्षक अनंता शिवरकर, शिक्षक रमेश ढुमणे आणि अंकुश कांबळे उपस्थित होते.

मार्डी येथील आदर्श हायस्कुल येथून नियत वयोमानानुसार दि.30 नोव्हेंबरला श्री.विलास ताजने निवृत्त झाले.त्यानिमित्ताने त्यांचा आदर्श हायस्कुल तर्फे सपत्नीक सत्कार करण्यात आला.आपल्या भाषणात पुढे बोलताना श्री ताजने सर म्हणाले की, माणूस किती जगतो यापेक्षा कसा जगतो हे महत्त्वाचे आहेत.आपली जडणघडण जर चांगली असली आणि संस्कार चांगले असले तर साहजिकच माणूस समोर चांगल्या प्रकारे घडू शकतो.माणसासमोर कितीही संकटे आली तरी त्या संकटाला न डगमगता आपण जर धैर्याने सामना केला तर जीवनात यश नक्कीच मिळते.
यावेळी कुमारी गौरी देवाळकर कुमारी तेजस्वी भगत,कुमारी मीनल इरदंडे या विद्यार्थिनींनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले.अध्यक्ष भास्करराव धानफुले यांनीही ताजने सरांच्या जीवनकार्याचा परिचय करून देत त्यांनी किती आपुलकीने शाळेसाठी कार्य केले हे सांगताना त्यांची विद्यार्थ्यांविषयी तळमळ आणि धडपड कशी होती हे सुद्धा सांगितले.डॉक्टर प्रशांत पाटील यांनीही त्यांच्या कार्याची प्रशंसा केली. शिक्षकांमधून रमेश ढुमणे,अनंत शिवरकर,प्रा.सुरेश नाखले,कुमारी नीतू मेश्राम यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे संचालन भास्कर राऊत यांनी,प्रास्ताविक जगन भोंगळे यांनी तर आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर दातारकर यांनी मानले. कार्यक्रमाला सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी श्री.भास्कर जिवतोडे यांनी सहकार्य केले.