वाहतूक शाखेकडील ई चालान मशीनमध्ये स्वतंत्र हेड खाली होणार कारवाई
सुरेश पाचभाई मारेगाव
यवतमाळ दिनांक 25 नोव्हेंबर 2024 च्या पत्रा नुसार विना हेल्मेट दुचाकीस्वार व पिलियन रायडर (सह प्रवासी) यांचे अपघात व त्या मृत्युमुखी तसेच जखमींच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्यामुळे विना हेल्मेट दुचाकीस्वार व त्यांच्या पाठीमागे बसलेल्या दोघांवर कारवाई करण्याचे आदेश वाहतूक विभागाचे अपर पोलीस महासंचालकांनी (Addl DGP Traffic Maharashtra) राज्यातील सर्व पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षकांना दिले आहेत.
त्याबाबतचे पत्र नुकतेच सर्वांना पाठविण्यात आले आहे. आता सहप्रवाशांवर स्वतंत्र हेड खाली कारवाई होणार असून त्यासाठी ई चालान (e-Challan) मशीनमध्ये बदल करण्यात आला आहे.
अपर पोलीस महासंचालक(वाहतूक) यांनी सर्वांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, राज्यातील मागील 5 वर्षातील रस्ते अपघातांचा आढावा घेतला असता असे दिसून येते की विना हेल्मेट दुचाकीस्वार पिलियन रायडर व सहप्रवासी यांचे अपघात, मृत्युमुखी तसेच जखमींच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे.
तसेच सेक्शन 128 आणि 129 मोटार वाहन कायदा 1988 कायद्यातील तरतुदीप्रमाणे विना हेल्मेट दुचाकीस्वार व पिलीयन रायडर यांचे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पोलीस घटकांकडून प्रभावीपणे अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत आहे.

मा.सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ते सुरक्षा समितीने दिलेले उद्दिष्ट व सूचनांची माहिती संबंधित सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना देण्यात यावी. प्रभावीपणे व कडक अंमलबजावणी करण्यात यावी. तसेच वाहतूक केसेस करीता वापरण्यात येणाऱ्या ई चालान मशीनमध्ये विना हेल्मेट दुचाकीस्वार व विना हेल्मेट पिलीयन रायडर या दोन्ही केसेसची कारवाई या एकाच हेडखाली आल्याने विना हेल्मेट रायडर व विना हेल्मेट पिलीयन रायडर यांची वेगवेगळी माहिती मिळत नव्हती.
तरी ई चालान मशीनमध्ये सेक्शन 129/194 (ड) एमव्ही ए शिर्षकामध्ये बदल करण्यात येत असून या पुढील कारवाई ही 1) विना हेल्मेट रायडर 2) विना हेल्मेट पिलीयन रायडर (सह प्रवासी) अशा दोन वेगवेगळ्या हेडखाली कडक व प्रभावीपणे करण्यात यावी. जेणेकरुन दुचाकीस्वार चालक व सह प्रवासी यांचे अपघात, मृत्युमुखी व जखमींची संख्या निश्चितच कमी होण्यास मदत होईल, असे या पत्रात म्हटले आहे.