सुरेश पाचभाई, मारेगाव
मारेगाव तालुक्यातील बोटोनी गावाजवळील जंगल परिसरात आज दिनांक ५ सप्टेंबर २०२५ रोज शुक्रवारला दुपारी वाघाच्या हल्ल्यात एक दीड वर्षांचा गोरा ठार झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
गावातील शेतकरी नामदेव रामपुरे यांचे पशुधन जंगलात चरण्यासाठी गेले असता दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्या गोऱ्यावर झडप घातली. यात अंदाजे १० हजार रुपये किमतीचा हा गोरा जागीच ठार झाला. सदर घटना आज दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.
घटनेची माहिती मिळताच बोटोनी येथील क्षेत्र सहाय्यक ए. एस. कुळमेथे यांच्यासह वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. वाघाच्या हल्ल्यानंतर गावकऱ्यांनी तात्काळ योग्य ती नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.
गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अलीकडच्या काळात जंगल परिसरात वाघांची हालचाल वाढली असून जनावरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्यामुळे वनविभागाने तातडीने आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी होत आहे.
वनविभागाचे आवाहन
“बोटोनी परिसरात वाघ आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. शेतात जाताना समूहाने व बोलत-गात चालावे. एकटे जाताना गाणी, भजन म्हणावे किंवा मोबाईलवरील गाणी मोठ्या आवाजात ऐकावी, ज्यामुळे वाघाला मानवी उपस्थितीची जाणीव होईल. अशा सूचना आम्ही गावकऱ्यांना वारंवार देत असतो,” असे मारेगाव वनपरीक्षेत्र अधिकारी शंकर हटकर यांनी सांगितले.