आमदार संजय देरकर यांच्यावतीने महाप्रसादाचे आयोजन
तालुका प्रतिनिधी वणी
वणी तालुक्यातील बाबापुर येथे गणेश चतुर्थीच्या पावन पर्वावर नवसाला पावणाऱ्या गणेशाची स्थापना करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशभक्तांनी मोठ्या श्रद्धेने गणपतीचे दर्शन घेतले. लाखो भाविकांनी दर्शनासह महाप्रसादाचा लाभ घेतला.

दिनांक ५ सप्टेंबर रोजी वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय देरकर व त्यांच्या धर्मपत्नी सौ. किरणताई संजय देरकर यांनी बाबापुर येथे येऊन नवसाला पावणाऱ्या गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी आमदार संजय देरकर म्हणाले, “मी निवडणुकीदरम्यान प्रचारासाठी बाबापुर येथे आलो असता गणपती बाप्पाला नवस केला होता.

गणपती बाप्पाने तो नवस पूर्ण केला आहे. म्हणून मी येथे येणाऱ्या सर्व गणेशभक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले आहे. माझ्या वणी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी, शेतमजूर व नागरिक सुखी, समृद्ध व निरोगी राहो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना केली आहे.”

या प्रसंगी नितीन हींगोले (उपविभागीय अधिकारी वणी, मारेगाव, झरी), संबंधित तालुक्यांचे तहसीलदार, गटविकास अधिकारी तसेच विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरवर्षीप्रमाणे यंदाही बाबापुरात दहा दिवसांचा गणेश जत्रा महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडत आहे. रोज सरासरी १५ ते २० हजार भाविक दर्शनासाठी उपस्थित राहत होते. भाविकांच्या सोयीसाठी पार्किंग व्यवस्था, कायदा-सुव्यवस्था व महिला सुरक्षेची काटेकोर व्यवस्था करण्यात आली होती.

याकरिता सुरेश दळवे (उपविभागीय पोलिस अधिकारी, वणी) यांच्या मार्गदर्शनाखाली माधव शिंदे (ठाणेदार, शिरपूर पोलिस स्टेशन), वाहतूक शाखा, महिला पोलिस, होमगार्ड यांनी प्रभावी पोलिस बंदोबस्त ठेवला.