सुरेश पाचभाई पाचभाई मारेगाव,
मारेगाव : तालुका कृषि अधिकारी कार्यालयाच्या पुढाकाराने, आरोग्य विभाग व सिंजेंटा इंडिया प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने सुरक्षित कीटकनाशक फवारणी मार्गदर्शन व शेतकरी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमात तालुका कृषि अधिकारी कु. दिपाली खवले यांनी सुरक्षित फवारणीचे महत्त्व स्पष्ट करताना सुरक्षा किटचा वापर, वाऱ्याचा वेग लक्षात घेऊन फवारणी करण्याची आवश्यकता तसेच कपाशी व तुरीसारख्या उंच वाढलेल्या पिकांमध्ये फवारणी करताना घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. फवारणीच्या वेळी धूम्रपान, तंबाखूचे सेवन व मद्यपान यांसारख्या बाबी टाळण्याचे आवाहनही त्यांनी केले.

या प्रसंगी आरोग्य विभागाचे अधीक्षक डॉ. इंगळे यांनी कीटकनाशक फवारणी विषबाधा झाल्यास करावयाच्या तात्काळ उपाययोजना, प्रथमोपचार आणि त्यावरील योग्य वैद्यकीय उपचारांची माहिती शेतकऱ्यांना दिली. शेतकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी डॉ. अर्चना इंगळे व डॉ. पडवले यांचे सहकार्य लाभले.
सिंजेंटा इंडिया प्रा. लि. चे प्रतिनिधी आशिष मोघे यांनी शेतकऱ्यांसाठी सुरक्षा किट उपलब्ध करून दिल्या. कार्यक्रमात शेतकऱ्यांना फवारणी सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाला तालुका गुणनिरीक्षक सुरेश बुटले, मंडळ कृषि अधिकारी किशोर डोंगरकार, उपकृषी अधिकारी विनायक जुमनाके, नंदकिशोर आत्राम, सहायक कृषि अधिकारी निखिल पवार, सौदागर यादव, नायक तसेच तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक प्रसन्न पारस्कर उपस्थित होते.


