सुरेश पाचभाई मारेगाव,
मारेगाव : तालुक्यात यंदा मोठ्या प्रमाणात कापुस पिकाची लागवड झाली असून सध्याच्या हवामानानुसार गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर कापुस पिकाचे नुकसान टाळण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन अत्यावश्यक असल्याचे मत तालुका कृषि अधिकारी कु.दिपाली खवले यांनी व्यक्त केले.
कृषि विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांनी संतुलित खतांचा वापर करताना अतिरिक्त नत्रयुक्त खतांचा वापर टाळावा. शेतात पक्ष्यांना बसण्यासाठी पक्षीथांबे उभारण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. तसेच गुलाबी बोंड अळीचे वेळोवेळी सर्वेक्षण करण्यासाठी प्रति हेक्टर पाच कामगंध सापळे लावणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले.
तसेच डोमकळ्या, किडलेली पाने, फुलं व बोंडं त्वरित तोडून नष्ट करावीत. जैविक नियंत्रणाच्या दृष्टीने ट्रायकोग्रामा या परोपजीवी कीटकांची अंडी प्रति हेक्टर एक लाख प्रमाणात सोडावीत. सुरुवातीच्या टप्प्यात वनस्पतीजन्य कीटकनाशकांचा वापर फायदेशीर ठरतो, असेही कृषि विभागाने स्पष्ट केले.
किडीचा प्रादुर्भाव पाच टक्क्यांपेक्षा जास्त झाल्यास किंवा कामगंध सापळ्यात सलग तीन दिवस सात ते आठ नर पतंग दिसून आल्यास इमामेक्टिन बेंसोएट, क्लोरअँट्रानिलीप्रोल, थिओडीकार्ब, प्रोफेनोफॉस किंवा इतर शिफारशीत अळी नाशकांची फवारणी करावी, असेही विभागाने सांगितले.
कृषि विभागाने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, योग्य वेळी योग्य उपाययोजना केल्यास गुलाबी बोंड अळीवर प्रभावी नियंत्रण मिळवता येऊ शकते आणि पिकाचे मोठे नुकसान टाळता येऊ शकते.


