प्रा. डॉ. संतोष डाखरे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व

0
753

विदर्भ एस.पी.न्यूज नेटवर्क डेस्क, मारेगाव

मारेगाव- तालुक्यातील मांगरूळ या गावातील प्रा. डॉ. संतोष संभाजी डाखरे हे आज एक  लेखक आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक तथा राजकीय विश्लेषक म्हणून  सर्वांना परिचित आहे. ही ओळख त्यांना सहजासहजी मिळाली नसून याकरिता त्यांना खडतर प्रवास करावा लागला. आज त्यांच्या वाढदिवशी त्यांच्या यशस्वी प्रवासाचा घेतलेला हा आढावा.

सर्वसाधारण शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या डॉ. संतोष डाखरे यांचे प्राथमिक शिक्षण जि. प. शाळा मांगरूळ येथे, उच्च प्राथमिक शिक्षण जि. प. शाळा कोलगाव येथे तर माध्यमिक शिक्षण विवेकानंद शाळा, वणी येथे झाले. लोकमान्य टिळक महाविद्यालयातून पदवी प्राप्त केल्यानंतर यवतमाळ येथील अमोलकचंद महाविद्यालयात त्यांनी एम.ए. राज्यशास्त्रसाठी प्रवेश घेतला.

नंतरच्या काळात खरेदी विक्री संस्था मारेगाव येथे रोजंदारीवर त्यांनी कामहि केले.वाचनाची आणि लिखाणाची आवड त्यांना वणी येथील लोकमत वृत्तपत्र कार्यालयात घेऊन गेली. तिथे सहाय्यक उपसंपादक म्हणून त्यांनी दोन वर्ष काम केले. लोकमतचे संपादक संतोष कुंडकर यांच्या मार्गदर्शनात त्यांची पत्रकारिता बहरली. या कालावधीत सामाजिक भान ठेवून त्यांनी लिखाण केले.

एक पत्रकार म्हणून जनतेच्या प्रश्नांना आपल्या लेखणीतून वाचा फोडली. संतोष कुंडकर यांच्या मार्गदर्शनात शहरात अनेक नवीन उपक्रम राबविलेत. हे सुरु असतानाच शिक्षणात मात्र त्यांनी खंड पडू दिला नाही. नागपूर विद्यापीठातून राज्यशास्त्र विषयात आचार्य पदवी प्राप्त करून ते गडचिरोली जिल्यातील भामरागड येथील राजे विश्वेश्वरराव महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झालेत. (आचार्य पदवी प्राप्त करणारे ते गावातील प्रथम व्यक्ती आहेत.)

एकदा कायमस्वरूपी नोकरी मिळाली की त्यामध्येच समाधान मानून जीवन व्यतीत करणारे अनेक असतात. डॉ. संतोष डाखरे मात्र यास अपवाद ठरलेत. लिखाणाची परंपरा त्यांनी कायम ठेवली, एक बुद्धीजीवी म्हणून सामाजिक आणि राजकीय प्रश्नांवर त्यांनी पुण्यनगरी, लोकमत, सकाळ, अग्रोवन, केसरी सारख्या प्रसिद्ध वृत्तपत्रातून संपादकीय लिखाण केले.

(आजही करत आहेत.) त्यांचे पन्नासच्यावर लेख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नलमधून प्रकाशित झाले आहे. अनेक परिषदांमधून त्यांनी आंतरराष्ट्रीय विषयावर व्याख्यान दिले आहेत. आजवर त्यांची सात पुस्तके प्रकाशित झाली असून आगामी दोन पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहे. यातील बहुतांश पुस्तकांचा संदर्भग्रंथ म्हणून गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे.

( सुप्रसिद्ध समाजसेवी दांपत्य डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांच्या हस्ते त्यांच्या लक्ष्यवेध पुस्तकाचे प्रकाशन झाले होते. ) लिखाणाबरोबरच गायनाची आवड असणाऱ्या डॉ. डाखरे यांनी नुकताच विद्यापीठस्तरीय गीत गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला आहे. २०२० मध्ये संसदपटू वामनराव चटप यांच्या वाढदिवासानिमित्त घेण्यात आलेल्या ‘जिल्हास्तरीय ऑनलाईन गीत गायन’ स्पर्धेतहि त्यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला होता. ते कवीही असून त्यांच्या अनेक कवितांना पुरस्कार प्राप्त झाले आहे. उत्कृष्ट सूत्र संचालक, निवेदक आणि मुलाखतकार म्हणूनही त्यांनी अनेक मंच गाजविले आहे.

*पुरस्कार*
नेपाल येथील भानू प्रतिष्ठानचा ‘उत्कृष्ट लेखक पुरस्कार’, अतिदुर्गम व नक्षल प्रभावित भागात राबविलेल्या मतदार जनजागृती मोहिमेकरिता गडचिरोली जिल्हा प्रशासनाचा ‘जिल्हा गौरव पुरस्कार’, संविधान जनजागृती व शैक्षणिक योगादानाकरिता ‘भामरागड रत्न पुरस्कार’, असे विविध पुरस्कार त्यांना प्राप्त आहे. सद्या ते ‘सावित्रीबाई फुले शोध संस्थान’ या संस्थेचे महाराष्ट्रप्रांत अध्यक्ष, राज्यशास्त्र अभ्यास मंडळ सदस्य, (गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली), महाराष्ट्र राज्यशास्त्र व लोकप्रशासन परिषद सदस्य, राज्यशास्त्र प्राध्यापक परिषदेचे (विदर्भ प्रांत ) आजीवन सदस्य तथा निसर्ग अभ्यासक फाउंडेशनचे मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहे.

एक अभ्यासू, कृतीशील व विद्यार्थीप्रिय शिक्षक, लेखक, स्तंभलेखक, गायक, कवी, निवेदक, सूत्र संचालक व मुलाखतकार असे बहुआयामी व्यक्तिमत्व डॉ. संतोष डाखरे हे खऱ्या अर्थाने मारेगाव तालुक्याचा बहुमान आहे, अशा अष्टपैलू व्यक्तिमत्वास विदर्भ एस.पी.न्यूज नेटवर्क मारेगावच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

शुभेच्छुक: – संपादक – इंजिनियर सुरेश पाचभाई व टीम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here