सुरेश पाचभाई, मारेगाव
मारेगाव : तालुक्यात रब्बी हंगामाची सुरु असलेली पेरणी लक्षात घेता कृषी विभागातर्फे ठिकठिकाणी बिजप्रक्रिया मोहीम राबविण्यात येत असून शेतकऱ्यांमध्ये रोगनियंत्रणाबाबत जागृती निर्माण करण्यावर भर देण्यात येत आहे. तालुका कृषी अधिकारी कु.दीपाली खवले व मंडळ कृषी अधिकारी डोंगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम प्रभावीपणे सुरू आहे.
हरभरा पिकावर येणारा मर रोग नियंत्रणात ठेवण्यासाठी कुंभा श्रीरामपूर परिसरात सहाय्यक कृषी अधिकारी श्री. सोनुळे यांनी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिके देत बिजप्रक्रिया म्हणजेच पिकांचे लसीकरण किती महत्त्वाचे आहे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. आगामी काळात रोगांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पेरणीपूर्वी योग्य बीजप्रक्रिया करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रात्यक्षिक प्रसंगी सहाय्यक कृषी अधिकारी श्री. पारधी, श्री. थोरात, गावचे सरपंच रामभाऊ मेश्राम, पो. पाटील रामचंद्र मेश्राम तसेच परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. शेतकऱ्यांनीही या मोहिमेबाबत समाधान व्यक्त करत योग्य तंत्रज्ञान आत्मसात करण्याची तयारी दर्शविली.तालुक्यात पुढील काही दिवसांमध्येही अशी प्रात्यक्षिके व जागृती मोहिमा राबविण्याची माहिती कृषी विभागाने दिली.


