बातमी ऐका (Marathi Voice Reader)
पुणे : पुण्याच्या खेड तालुक्यातील कुरकुंडी गावातून एक अतिशय धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. यात काही महाविद्यालयीन विद्यार्थिनींचा घोळका बस थांब्यावर थांबला होता. त्या बसची वाट पाहात होत्या. मात्र, बसच्या आधी एक कार अंगावर काळ बनून धावत आली. भरधाव वेगात आलेल्या कारने या विद्यार्थिनींच्या घोळक्याला चिरडलं. यात आदिती नववाथ राळे नावाच्या विद्यार्थिनीचा दु्र्दैवी मृत्यू झाला आहे. तर, इतर पाच विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्या आहेत. घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली.
या घटनेत जखमी झालेल्या विद्यार्थिनींना लगेचच राजगुरूनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. इथे त्यांच्यावर उपचार सुरू आहे. हा अपघात शुक्रवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास घडला. यात कुरकुंडी फाटा येथील बसथांब्यावर काही विद्यार्थिनी बसची वाट पाहात थांबल्या होत्या. कॉलेजला निघालेल्या या सात-आठ विद्यार्थिनी थांब्यावर उभा असतानाच राजगुरुनगरकडून येणाऱ्या एका चारचाकी वाहनाने या विद्यार्थिनींना चिरडलं.
ही घटना घडताच विद्यार्थिनींनी आरडाओरडा केला. अपघातानंतर वाहनचालक तिथून पळून गेला. जखमी विद्यार्थिनींना लगेचच उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान आदिती राळे या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला.
मतदान केंद्राकडे जाताना अपघात
विद्यार्थिनींना धडक देणाऱ्या कारबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ज्या वाहनाने हा अपघात केला, त्या वाहनातून शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार सचिन सानप यांचा बूथ प्रतिनिधी पाझर मतदान केंद्राकडे चालला होता. घाईने जात असताना त्या वाहनचालकाकडून हा अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे. अपघाताची घटना समजताच उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी हजर झाले. फरारी वाहनचालकाला शोधून आणल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असं मृत विद्यार्थिनीच्या नातेवाईकांनी सांगितलं. या घटनेमुळे काही काळ परिसरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं.