बातमी ऐका (Marathi Voice Reader)
पुणे: पिंपरी चिंचवडकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. शहराला शुद्ध आणि पुरेसा पाणीपुरवठा करण्याच्या उद्देशाने चिखली याठिकाणी नवीन जलशुद्धीकरण केंद्र उभारण्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी 200 दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेचा प्रकल्प विकसित करण्यात येत असून, त्यासाठी उच्चदाब वीज जोडणीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी उच्चदाब वीजपुरवठा तात्पुरता बंद ठेवण्यात येणार आहे. कामादरम्यान कामगार सुरक्षितता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे गुरुवारी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत शहरातील काही भागात पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे.
गुरुवारी या भागात पाणीपुरवठा खंडित…
गुरुवारी होणाऱ्या या कामामुळे शहरातील अनेक भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. बोऱ्हाडेवाडी, इंद्रायणीनगर, सेक्टर 4, 6, 9, 11 आणि 12, शीवरस्ता, चक्रपाणी वसाहत, धावडेवस्ती, मोशी, चऱ्होली, डुडुळगाव आणि चोवीसावाडी परिसरातील नागरिकांना याचा फटका बसणार आहे. या भागांसह आजूबाजूच्या परिसरातही गुरुवारी पाणी येणार नाही.
पाऊस इज बॅक! महाराष्ट्रात पुन्हा धुमशान सुरू, 48 तास महत्त्वाचे, 13 जिल्ह्यांना अलर्ट
वीज जोडणीचे काम पूर्ण झाल्यानंतर शुक्रवारी पाणीपुरवठा पूर्ववत होण्यास काही वेळ लागू शकतो. त्यामुळे शुक्रवारी सकाळी पाणी कमी दाबाने येण्याची शक्यता असून, काही ठिकाणी पुरवठा अनियमित राहू शकतो.
पिंपरी-चिंचवड शहरातील पाण्याची गरज लक्षात घेऊन चिखली येथे नवीन जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचे काम सुरू आहे. या प्रकल्पातून दररोज 200 दशलक्ष लिटर पाणी शुद्ध करता येणार आहे. सध्या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या उच्चदाब वीज जोडणीचे काम केले जाणार आहे.
या कामासाठी वीजपुरवठा बंद ठेवावा लागणार आहे. त्यामुळे त्याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर होणार आहे. संबंधित भागातील नागरिकांनी गुरुवारच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन करून ठेवावे, असे आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.