ब्रेकिंग न्यूज
पिसगाव येथे मिस्त्री कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या Dhiraj Pardeshi Case Update | धीरज परदेशी प्रकरणी पोलिसांची कारवाई | Ahilyanagar Crime News पावसाळ्यात जनावराच्या तोंडाला अन् जिभेवर फोड, असू शकतो गंभीर आजराचा धोका, अशी घ्या काळजी वाह रे मित्र…! घरी आला, खाल्लं, पिलं अन् जाता जाता…, कोल्हापूर पोलिसांनी 24 तासांत उचललं महाआवास अभियानात प्रतीक्षा गाडगे यांची दमदार कामगिरी Shravan Astrology: श्रावणात ग्रह फिरले, कुणाला संधी तर कुणावर संकट. मेष ते मीन राशीवाले काय काळजी घ्याल? खर्च कमी अन् मिळेल भरघोस उत्पन्न, गट शेती ठरेल फायद्याची, कृषी तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला, Video Agniveer-Bharti-2026: भावांनो, लागा तयारीला…! कोल्हापुरात 14 सप्टेंबरपासून अग्निवीर भरती, कुणाला संधी? CRIME : रात्री बायकोसोबत ‘आखाड पार्टी’ केली अन् सकाळी शुद्धीत येताच डोक्यात कुकरचं झाकण घालून संपवलं! शिक्ष… Maratha OBC Reservation: मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा पेटणार? जरांगेंच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी OBC सम…
SP News Maregaon

राष्ट्रवादीत सुप्त संघर्ष सुरू झालाय का?:सुनेत्रा पवारांसाठी नाजूक काळ; सुनील तटकरे – प्रफुल्ल पटेल नाराज झालेत का? पुढे काय?

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत हालचाली पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या कार्यकारिणीतून ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना डावलल्याच्या चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मंत्री अनिल पाटील यांनी हे वृत्त फेटाळले असले, तरी त्यानंतर घडलेल्या राजकीय भेटीगाठी व सूचक विधानांमुळे या चर्चेला अधिक धार मिळाली आहे. विशेष म्हणजे, या घडामोडींकडे केवळ संघटनात्मक बदल म्हणून पाहिले जात नाही, तर त्यामागे राष्ट्रवादीतील नव्या नेतृत्वाचे केंद्रीकरण, कौटुंबिक राजकारणाचा वाढता प्रभाव आणि जुन्या पिढीतील नेत्यांची अस्वस्थता असे अनेक पदर दिसून येत आहेत. त्यातच पटेल व तटकरेंनी घेतलेली शरद पवारांची भेट व त्यानंतर पवारांनी या दोघांची केलेली प्रशंसा यामुळेही राजकीय चर्चांना नवा रंग मिळाला आहे. सुनेत्रा पवार स्वतःचे स्थान बळकट करत आहेत का? विश्लेषकांच्या मते, सध्याच्या घटनांकडे केवळ ‘पक्षांतर्गत बदल’ म्हणून पाहणे पुरेसे ठरणार नाही. कारण अजित पवारांच्या निधनानंतर पक्षात निर्माण झालेली नेतृत्वाची पोकळी भरून काढण्याचे मोठे आव्हान सुनेत्रा पवारांसमोर उभे राहिले आहे. आतापर्यंत अजित पवार हे निर्णयक्षम, आक्रमक व पक्ष संघटनेवर पकड असलेले नेतृत्व म्हणून ओळखले जात होते. आता त्यांच्या अनुपस्थितीत पक्षात अधिकारांचे नवीन केंद्र निर्माण होणे अपरिहार्य आहे. अशा परिस्थितीत सुनेत्रा पवार या स्वतःचे नेतृत्व कौशल्य सिद्ध करण्याच्या प्रयत्नांत आहेत का? हा प्रश्न आता उघडपणे विचारला जाऊ लागला आहे. त्यामुळे पक्षातील निर्णयप्रक्रिया अधिक केंद्रीत करणे, स्वतःच्या विश्वासातील लोकांना पुढे आणणे व संघटनेवर थेट पकड निर्माण करणे हे त्या दिशेने टाकलेले पाऊल मानले जात आहे. राजकारणात नेतृत्व केवळ पदाने सिद्ध होत नाही. ते नियंत्रण, निर्णयक्षमता व राजकीय संदेश आदींमधून अधोरेखित होते. त्यामुळेच कार्यकारिणीतील बदलांच्या चर्चेला एवढे महत्त्व प्राप्त झाले आहे. आतापर्यंत अधिकृतरीत्या कोणतीही कारवाई झाल्याचे सांगितले गेले नाही. पण ‘ही चर्चा बाहेर येणे’ हा देखील एक राजकीय संकेत मानला जात आहे. तटकरे, पटेल खरेच नाराज आहेत का? सुनील तटकरे आज पत्रकारांशी बोलताना ‘आम्हाला 42 वर्षांचा राजकीय अनुभव आहे’ असे नमूद केले. त्यांची ही प्रतिक्रिया वरवर पाहता साधी वाटू शकते, पण महाराष्ट्राच्या राजकारणात अशा वाक्यांमागे अनेक खोल संदेश दडलेले असतात. हा अनुभवाचा उल्लेख प्रत्यक्षात ‘आम्हाला बाजूला सारणे सोपे नाही’ असा अप्रत्यक्ष इशारा असल्याचे मानले जात आहे. सुनील तटकरे व प्रफुल्ल पटेल हे दोघेही राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून पक्षाचे आधारस्तंभ राहिले आहेत. तटकरे यांनी कोकणात पक्षाची मजबूत संघटना उभी केली, तर प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादीला राष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून देण्यात मदत केली. त्यामुळे त्यांना अचानक कथित दुय्यम स्थान दिले जात असल्याची भावना निर्माण झाली, तर ती केवळ वैयक्तिक नाराजी न राहता पक्षातील मोठ्या अस्वस्थतेचे रूप घेऊ शकते. विशेषतः या दोन्ही नेत्यांनी अद्याप पक्षातील आपल्या कथितपणे घसरलेल्या राजकीय आलेखावर उघडपणे भाष्य केले नाही. पण राजकारणात अनेकदा शांतता हीच सर्वात मोठी अस्वस्थता मानली जाते. माध्यमांसमोर संयमित भाषा वापरणे व पडद्यामागे पर्याय खुले ठेवणे, ही महाराष्ट्रातील वरिष्ठ नेत्यांची पारंपरिक शैली राहिली आहे. शरद पवारांच्या भेटी, स्तुतीतून मोठा संदेश या संपूर्ण घटनाक्रमात सर्वाधिक लक्ष वेधून घेणारी बाब म्हणजे सुनील तटकरे व प्रफुल्ल पटेल यांनी घेतलेली शरद पवारांची भेट. या दोन्ही नेत्यांनी काही दिवसांपूर्वीच शरद पवारांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. त्यानंतर शरद पवारांनी एका पत्रकार परिषदेत या दोन्ही नेत्यांच्या राजकीय कौशल्याचे कौतुक केले होते. त्यामुळे पवार व या दोन्ही नेत्यांची भेट केवळ शिष्टाचार नव्हती, असे राजकीय वर्तुळात मानले जात आहे. शरद पवार यांची राजकीय शैली ही थेट संघर्षापेक्षा शांतपणे समीकरणे बदलण्याची राहिली आहे. ते सार्वजनिकरित्या फार कमी बोलतात, पण त्यांच्या भेटी, स्तुती व शांत हालचाली यामधून मोठे संदेश दिले जातात. त्यामुळे या भेटीद्वारे पटेल व तटकरेंनी आपल्यापुढे राजकीय पर्याय खुले आहेत असा संदेश दिल्याचीही चर्चा आता उघडपणे केली जात आहे. विशेष म्हणजे, शरद पवार हे अजूनही राष्ट्रवादीच्या जुन्या पिढीतील अनेक नेत्यांसाठी भावनिक व राजकीय केंद्र मानले जातात. त्यामुळे सत्ताधारी राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थता वाढली, तर त्याचा सर्वाधिक फायदा शरद पवार गटाला होऊ शकतो. पार्थ पवार पक्षात सक्रिय झालेत का? या सगळ्या चर्चेत आणखी एक नाव सातत्याने पुढे येत आहे. ते म्हणजे पार्थ पवार. गेल्या काही महिन्यांत पक्षातील विविध बैठका, युवा कार्यकर्त्यांशी संवाद व काही निर्णय प्रक्रियांत त्यांचा वाढता सहभाग चर्चेचा विषय ठरत आहे. विश्लेषकांच्या मते, राष्ट्रवादीत आता नव्या पिढीचे नेतृत्व उभे करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र हा बदल किती सहजतेने स्वीकारला जाईल, हा मोठा प्रश्न आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष नेहमीच राज्यातील वजनदार नेत्यांच्या संतुलनावर चालत आला आहे. प्रत्येक जिल्ह्यात स्वतःचा प्रभाव असलेले नेते हे या पक्षाची खरी ताकद आहे. त्यामुळे या नेत्यांमध्ये पक्षाचे नेतृत्व काही मोजक्या व्यक्तींमध्ये केंद्रीत होत असल्याची भावना निर्माण झाली, तर त्याचे पडसाद संघटनेत उमटू शकतात. सुनेत्रा पवारांसाठी सध्याची परिस्थिती अत्यंत नाजूक सुनेत्रा पवारांसाठी सध्याची परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. एका बाजूला त्यांना स्वतःचे स्वतंत्र नेतृत्व सिद्ध करायचे आहे, तर दुसऱ्या बाजूला पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचा आदर-सन्मानही राखायचा आहे. कारण राज्याचा राजकीय इतिहास पाहिला तर पक्षातील बंडखोरी अनेकदा ‘स्वाभिमान दुखावला’ या भावनेतून सुरू झाल्याचे अनेक दाखले आहेत. त्यामुळे सुनेत्रा पवार खरोखरच पक्षात मजबूत नेतृत्व उभे करण्याच्या प्रयत्नांत असतील, तर त्यांना केवळ निर्णयक्षम नव्हे तर समन्वय साधणारे नेतृत्व गुणही दाखवावे लागतील. कारण पक्ष चालवणे आणि सत्ता टिकवणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. सत्तेत असताना नाराज गट नियंत्रणात ठेवणे हीच खरी नेतृत्वाची परीक्षा असते. राष्ट्रवादीत पुन्हा मोठा राजकीय बदल? सध्या तरी सत्ताधारी राष्ट्रवादीमध्ये सर्व काही नियंत्रणात असल्याचे चित्र दाखवले जात आहे. मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात अनेकदा सर्वात मोठे बदल हे आधी अफवांच्या रूपातच समोर आले आहेत. त्यामुळे सुनील तटकरे – प्रफुल्ल पटेल यांच्याविषयी सुरू असलेली चर्चा हलक्यात घेतली जाऊ शकत नाही. एकीकडे सुनेत्रा पवार स्वतःचे नेतृत्व सिद्ध करण्याच्या प्रयत्नांत असल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे पार्थ पवारांचे कथित वाढते वर्चस्व आणि तिसरीकडे शरद पवारांची शांत, पण सूचक हालचाल, या तिन्ही गोष्टी एकत्र आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या सत्तासंघर्षाची सुरूवात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर