किडीचा सुध्दा प्रादुर्भाव : शेतकरी हवालदिल
सुरेश पाचभाई मारेगाव,
मारेगाव तालुक्यात 5 हजार 297 हेक्टर वर तुरीची लागवड करण्यात आली असुन तुर बहरली परंतु मागील काही दिवसापासून ढगाळ वातावरणा सह पाऊस पडत असल्याने याचा परिणाम थेट कापुस,तुरी,गहु ,चना या पिकांवर जाणवायला लागला असुन किडींचा सुध्दा प्रादुर्भाव असल्याने तूर उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी संकटात सापडण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.
सततच्या नापिकीमुळे त्रासलेल्या शेतकऱ्यावर नेहमीच संकटाची टांगली तलवार असते.वातावरणात होणार बदल जर कोणाला जाणवत असेल तर तो सर्वात आधी शेतातील पिकावर जाणवायला लागतो.अशीच परिस्थिती आज कापुस, गहु, चण्यासह तुरीच्या उभ्या पिकावर येऊन ठाकली आहे. पाऊस व ढगाळ वातावरणामुळे फुलगळ व किडीचा प्रादुर्भाव होऊ शकतो.याचा मोठा फटका शेतकऱ्याला बसणार असल्याचे दिसत असुन त्यामुळे मात्र उभे पीक पुन्हा हातुन जाणार ही भिती शेतकऱ्यांना सतावत असुन शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर नैराश्य दिसायला लागले आहे.

अशा वातावरणामुळे निर्माण झालेली कीड सुद्धा मोठा प्रश्न आहे.तर गळणारी फुले व कीड यावर कोणताही उपाय नसल्याने या समस्येला सामोर जायचे तरी कसे? पीक कसे वाचवावे याकरिता जगाच्या पोशिंद्याची धावपळ सुरू आहे.आधीच तालुक्यात दुष्काळग्रस्त परिस्थिती आणि त्यात पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे हाती येणाऱ्या पिकापासून मुकावे लागते की काय,अशा परिस्थितीत आज शेतकरी सापडला आहे.मारेगाव तालुक्यात 44424 हजार हेक्टर कृषी क्षेत्र आहे.त्यात 5 हजार 297 हेक्टर वर तुर पीक असुन ढगाळ वातावरणाने चांगलाच विपरीत परीणाम होत आहे.

तालुक्यातील शेत शिवारातील तूर या पिकावर शेंगापोखणाऱ्या,पिसारा पतंग आणि शेंगे माशीनी आक्रमण केल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे.त्यामुळे तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला असुन संकटाची मालीका शेतकऱ्यांची पाठ सोडत नसल्याने कपाशी,सोयाबीन,व आता तुर हातची जाणार त्यामुळे परत एकदा आर्थिक फटका बसणार असल्याची चर्चा सुरू आहे.