प्रस्तावित बसस्थानकासाठी अडीच कोटी मंजूर
आमदार संजीव रेड्डी बोदकूरवार यांच्या प्रयत्नांना यश
सुरेश पाचभाई मारेगाव,
मारेगाव तालुक्यात बहुप्रतिक्षित असलेले बस स्थानक अखेर पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत.बस स्थानकासाठी अडीच कोटीचा निधी मंजूर झाला असून त्यातील पहिला हप्ता 20 टक्के रक्कम ही बस स्थानक प्रशासनाकडे सुपूर्द केल्याची माहिती वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीव रेड्डी बोदकूरवार यांनी दिली.
ते मारेगाव येथील पक्षकार्यालयामध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले आणि मारेगावकरांचे स्वप्न असलेले मारेगाव येथील बस स्थानक यासाठी अनेक आंदोलन झाले.पक्के बसस्थानक नसल्याने रस्त्याच्या आडोशाला किंवा एखाद्या दुकानाच्या सावलीमध्ये प्रवाशी उभे राहत होते.
प्रवाशांची मोठया प्रमाणात गैरसोय होत होती. ही बाब लक्षात घेऊन बसस्थानकासाठी 2 कोटी 49 लाख 68 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला.त्यापैकी 20% रक्कम ही महामंडळाकडे सुपूर्द करण्यात आला आहे. मारेगाव तालुक्याला आजपर्यंतचा सर्वात जास्त निधी मिळाला असून तालुक्याचा चेहरा मोहराच बदलून जाणार असल्याचा आशावादही व्यक्त केला.
मारेगाव तालुक्यासाठी 132 केवी चा प्रस्ताव असून तो या दोन महिन्यांमध्ये मंजूर करून घेण्यात येईल असे आश्वासनही त्यांनी दिले. तालुक्याचा प्रलंबित असलेला क्रीडांगणाचा प्रश्न सुद्धा लवकरच सोडवला जाईल. प्रत्येक गावांना 10 ते 20 लाख रुपयाचा निधी मिळणार असून ग्रामपंचायत स्तरावर या निधीचे वितरण केले जाणार आहे.


