गणेशपूर -हिवरदरा शिवारातील घटना
उपसंपादक झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
मोहदा येथे वास्तव्यास असलेला विद्यार्थी आपल्या मित्राला तेजापुर या गावी सोडण्यास जात असतांना गणेशपुर हिवरदरा शिवारात पल्सर दुचाकीचा भिषण अपघात झाला.रात्रीच्या अंधारात रस्त्याने जात असलेली म्हैस अचानक दुचाकीच्या समोर आली. धडक जबर होती या अपघातात घटनास्थळीच दोघांचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास घडली.

गणेश कैलास टेकाम (१८) राहणार मोहदा ता.वणी व रोहित मरसकोल्हे (१९) राहणार तेजापुर असे दुर्दैवी मृतक विद्यार्थ्यांची नांवे आहेत. गणेश हा बारावीची परिक्षा देत होता. पेपर संपल्यानंतर त्यांने मित्राची पल्सर दुचाकी क्रमांक एम एच ४९ ए एक्स २८९५ ही घेतली. गणेशने आईला रात्री वेळाबाईला जातो असे सांगितले त्यानंतर रोहित सोबत मंगळवारी रात्री ११ वाजता गावी जाण्यास निघाला.त्यानंतर मित्राला तेजापुर येथे सोडण्यास जात असतांना गणेशपुर हिवरदरा शिवारात अपघात घडला.

मध्यरात्री दुचाकीने भरधाव जात असतांना त्यांना रस्त्याने जात असलेली म्हैस दिसली नाही. दुचाकी थेट म्हशीवर धडकली यामुळे दुचाकीस्वार विद्यार्थी रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात कोसळले. गंभीर दुखापत झाली होती, मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला तसेच ते रात्र भर तेथेच पडून राहीले. बुधवारी सकाळी मुकूटबन पोलीसांना माहिती मिळाली. मुकूटबनचे ठाणेदार संतोष मनवर व पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचले. घटनेचा पंचनामा करण्यात आला असुन पुढील तपास सुरु आहे.