मार्डी येथील सत्कार प्रसंगी काढले उद्गार
सुरेश पाचभाई मारेगाव
जोपर्यंत जीवनामध्ये संघर्ष केल्या जात नाही तोपर्यंत यश पदरात पडत नाही. क्षेत्र कोणतेही असो, जिथे संधी मिळेल तिथे आपल्या कार्याचा ठसा उमटवा.जग प्रेमाने जिंकता येते पैशाने नाही, असे उद्गार नव्यानेच विस्तार अधिकारी म्हणून पदोन्नती मिळालेले गणेश भोयर यांनी काढले.

ते जिल्हा परिषद शाळा मार्डी येथे शिक्षण परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या सत्कार समारंभात बोलत होते. यावेळी दुसरे विस्तार अधिकारी म्हणून ज्ञानेश्वर देऊळकर हेही उपस्थित होते. त्यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सुलोचना कासार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष,

प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर प्रशांत पाटील,पोलीस पाटील मार्डी, चित्रा बोंडे केंद्रप्रमुख, अनिता नालमवार मुख्याध्यापिका जिल्हा परिषद शाळा मजरा, नसीमा शेख, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य पौर्णिमा शेंडे शाळा व्यवस्थापन समिती सदस्या,नंदकिशोर कांबळे, पौर्णिमा शेंडे उपस्थित होत्या.
सत्काराला उत्तर देताना गणेश भोयर पुढे म्हणाले की, संघर्ष हा माझ्या पाचवीलाच पुजलेला होता. बी. एड. पासून तर मुख्याध्यापकाचे प्रमोशन होत पर्यंत तसेच विस्तार अधिकारी म्हणून प्रमोशन होत असतानाही मला संघर्ष करावा लागला. पण मी हार मानलेली नव्हती अखेर माझ्या प्रयत्नांना यश मिळाले आणि आज मला विस्तार अधिकारी म्हणून पदोन्नती मिळाली.

यावेळी दुसरे विस्तार अधिकारी म्हणून पदोन्नती मिळालेले ज्ञानेश्वर देऊळकर यांनीही मनोगत व्यक्त केले.तसेच चित्रा डहाके, आरती रहाने, चंद्रकांत सुके, चित्रा बोंडे आणि अनिता नालमवार यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे संचालन माधुरी लोहकरे, प्रास्ताविक राजेश मारोडकर तर आभार संयोगिता चिरडे यांनी मानले. कार्यक्रमाला मार्डी केंद्रातील सर्व मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक उपस्थित होते.