प्रगतशील शेतकरी रमेश पिदुरकर यांचा पुढाकार – मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण सोहळा
सुरेश पाचभाई मारेगाव
मारेगाव: तालुक्यातील हिवरी गावात प्रगतशील शेतीचा नवा अध्याय सुरू झाला आहे. गावातील प्रगतशील शेतकरी श्री. रमेश श्रीराम पिदुरकर यांच्या शेतात बुधवारी (दि. 20 ऑगस्ट 2025) दुपारी 3 वाजता केशर आंब्याची लागवड करून उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

या वृक्षारोपण सोहळ्याला तालुका कृषी अधिकारी दिपाली खवले, सहाय्यक कृषी अधिकारी श्री. सचिन आत्राम, तसेच संबंधित तलाठी श्री जीवन आत्राम हे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते आंब्याच्या रोपांना माती देऊन या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.

श्री. पिदुरकर यांच्या शेतातील या आंबा लागवड उपक्रमामुळे भविष्यात आंबा उत्पादनातून उत्पन्नवाढीसोबतच परिसरातील शेतकऱ्यांना प्रगतशील शेतीचे नवे मार्गदर्शन मिळणार आहे. केशर आंब्याचे उत्पादन हे केवळ बाजारपेठेतच नव्हे तर निर्यातीसाठीही फायदेशीर ठरणार असल्याचे कृषी तज्ज्ञांचे मत आहे.
गावातील शेतकरी वर्ग या उपक्रमामुळे प्रेरित होऊन आधुनिक शेतीकडे वळेल, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.


