मारेगाव पोलिस स्टेशनमध्ये शांतता समितीची बैठक संपन्न

0
534

आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्थेसाठी ठाम निर्धार

सुरेश पाचभाई, मारेगाव

मारेगाव : “उत्सव हा आनंदाचा, पण शांततेतूनच खरी गोडी,” या संदेशाने मारेगाव पोलिस स्टेशन येथे आज दिनांक 20 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 8 वाजता शांतता समितीची सभा पार पडली. पोळा, गणेशोत्सव, दुर्गा उत्सव व ईद-ए-मिलाद या आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचा ठाम निर्धार या सभेत करण्यात आला.

या बैठकीसाठी ठाणेदार मारेगाव अध्यक्षस्थानी होते, तर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भीमराव वनखंडे, शांतता समितीचे सदस्य, नागरिक व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ठाणेदारांनी स्पष्ट शब्दात सांगितले, “सण-उत्सव आनंदाने आणि शांततेत पार पाडणे ही सामूहिक जबाबदारी आहे. नागरिकांच्या सहकार्याने अनुचित प्रकारांना आळा घालण्यात पोलिस प्रशासन सज्ज आहे.”

बैठकीत वाहतूक व्यवस्थापन, ध्वनीप्रदूषण नियंत्रण, मिरवणुकींच्या वेळा व मार्ग निश्चिती, तसेच सुरक्षेसाठी घेण्यात येणाऱ्या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा झाली.

शांतता समिती सदस्यांनी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचे व बंधुभाव जपण्याचे आवाहन केले. विविध समाजघटक, धार्मिक मंडळे व पोलिस प्रशासन यांच्या एकत्रित समन्वयातून “शांततेतून उत्सव आणि उत्सवातून बंधुभाव” हा संदेश देण्याचा ठाम निर्धार सर्वांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here