सुरेश पाचभाई मारेगाव,
मारेगाव:शेतकऱ्यांच्या कष्टाचे प्रतीक आणि ग्रामीण संस्कृतीचे वैभव मानला जाणारा बैलपोळा उत्सव तालुक्यात शुक्रवार, २२ ऑगस्ट २०२५ रोजी मोठ्या जल्लोषात व पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आला.
शेतकऱ्यांच्या जीवनातील अविभाज्य सोबती असलेल्या बैलांच्या सन्मानाचा हा दिवस असल्याने ग्रामीण भागात या सणाला विशेष महत्त्व आहे. परंपरेनुसार शेतकरी आपले बैल स्नान घालून आकर्षक सजावट करतात. गळ्यात घंटा, रंगीबेरंगी हार, फिती, झगमगते दागिने परिधान करून बैलांची पूजा-अर्चा करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते.

गावागावात ढोल-ताशांच्या गजरात, लेझीम, फुगड्या, नृत्य व पारंपरिक खेळांनी वातावरण रंगून गेले. महिलावर्ग पोळ्याच्या खास पदार्थांची तयारी करण्यात मग्न होता तर लहान मुलांचा उत्साह अवर्णनीय होता.शेतकऱ्यांच्या घामाने पिकलेले अन्नधान्य आणि बैलांच्या अथक परिश्रमामुळेच समाजाला अन्न मिळते. त्यामुळे हा सण म्हणजे शेतकरी आणि बैलांच्या घट्ट नात्याचा सन्मान मानला जातो.

तालुक्यातील नागरिक, महिला व युवा वर्ग मोठ्या संख्येने उत्सवात सहभागी झाले. सर्वत्र आनंद, उत्साह आणि एकात्मतेचे वातावरण निर्माण झाले.विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव टीम तर्फे सर्व शेतकरी बांधवांना बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!


