पोलिस दलात हळहळ
सुरेश पाचभाई, मारेगाव
मारेगाव:पोलिस स्टेशनचे ठाणेदार पोलिस निरीक्षक उमेश बेसरकर वय ५७ वर्षे यांचे आज शनिवार, दिनांक २३ ऑगस्ट २०२५ रोज शनिवारला सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण पोलिस दलासह नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
गेल्या वर्षीच त्यांची बदली पुसद येथून मारेगावला झाली होती. आपल्या शांत, मनमिळावू व सर्वांना आपलेसे करून घेणाऱ्या स्वभावामुळे त्यांनी नागरिकांसोबतच सहकाऱ्यांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले होते. तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ते सदैव कडक आणि तत्पर म्हणून ओळखले जात.

आज सकाळी १०:३० वाजताच्या सुमारास त्यांच्या छातीत अस्वस्थता जाणवली. तातडीने त्यांना वणी येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या अकस्मात घटनेमुळे मारेगावसह यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांत हळहळ व्यक्त होत असून सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले असा परिवार आहे.


