शेतकरी कर्जमाफी, ओला दुष्काळ जाहीर करण्यासह महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात देण्याची मागणी
सुरेश पाचभाई मारेगाव,
मारेगाव :बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडी, तालुका मारेगाव यांच्या वतीने दिनांक २५ सप्टेंबर रोजी ‘कार्यकर्ता मेळावा व आक्रोश मोर्चा’ चे आयोजन करण्यात आले. या मोर्चात समाजातील विविध स्तरांतील नागरिकांचा मोठ्या संख्येने सहभाग होता.

या मेळाव्यात विविध सामाजिक, धार्मिक आणि शेतकरी विषयक प्रश्नांवर चर्चा झाली. त्यानंतर तहसीलदार मार्फत प्रशासनास मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे होत्या :
१) बिहारमधील बोधगया येथील महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन तात्काळ बौद्ध धर्मियांकडे सुपूर्द करावे.
२) शेतकऱ्यांचे सर्व प्रकारचे कर्ज सरसकट माफ करून सातबारा कोरा करावा.
३) अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची दखल घेऊन ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी.
मोर्चाच्या माध्यमातून शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या व्यथा मांडण्यात आल्या. शासनाने या मागण्यांवर तात्काळ कार्यवाही करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी आघाडीने मागणी केली.
या निवेदनावर राजेंद्र निमसटकर, ज्ञानेश्वर मुन, अनिल खैरे, अभिषा निमसटकर, यशोधरा लिहीतकर, रेखाताई काटकर, शोभाताई दारुंडे, शितलताई तेलंग, अनंता खाडे, रवींद्र तेलंग, संजय जीवने, शिवदास काबक आदींसह अनेक पदाधिकाऱ्यांनी सही केली.
मोर्चाचे निवेदन तहसीलदारांना सादर करून जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, मुख्यमंत्री, तसेच कृषी आणि सामाजिक न्यायमंत्री यांना प्रत पाठविण्यात आली आहे.


