सुरेश पाचभाई मारेगाव
मारेगाव: तालुक्यातील एका गावातील शेतमजुर दांपत्याच्या तिन्ही अल्पवयीन मुलांना एका व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यात 9 वर्षीय मुलगी व दोन लहान मुलांचा समावेश आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 19 सप्टेंबर) संध्याकाळी तालुक्यातील एका शेतशिवारात घडली. या प्रकरणी मारेगाव पोलिसांनी आरोपीविरोधात बीएनएस कलम 137 (2) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार शेतमजुरी करून उदरनिर्वाह करतो. दोन वर्षांपूर्वी तो अदिलाबाद जिल्ह्यातील निशानघाट येथे शेतीच्या कामानिमित्त गेला होता. तेथे त्याची एका महिलेबरोबर (वय 38) ओळख झाली. पुढे ही ओळख प्रेमात परिवर्तीत होऊन त्यांनी विवाह केला. विवाहानंतर पत्नी व तिची तीन मुलं यांना घेऊन तक्रारदार मारेगाव तालुक्यातील एका गावात शेतात सालगडी म्हणून राहू लागला.
दरम्यान, निशानघाट येथे काम करत असताना पत्नीची आरोपी देवीदास (वय 44, रा.मूळ गाव यवतमाळ जिल्हातील) याच्याशी ओळख झाली होती.शुक्रवारी संध्याकाळी आरोपी देवीदास तक्रारदाराच्या घरी आला. त्यावेळी पती-पत्नी शेतात मजुरीचे काम करत होते. “मी तुमच्या मुलांचे योग्य पालनपोषण करीन, त्यांना चांगले शिक्षण देईन” असे सांगून त्याने तिन्ही मुलांना फूस लावून नेले.
पती-पत्नी घरी परतल्यावर मुलं दिसली नाहीत. त्यांनी आरोपीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याचा मोबाईल बंद होता. दुसऱ्या दिवशी मुलांचा शोध घेण्यासाठी पत्नी निशानघाट येथे गेली. मात्र तेथेही आरोपी व मुलं कुठेच आढळून आले नाहीत. अखेर तक्रारदाराने मारेगाव पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी देवीदासविरोधात तिन्ही मुलांना फूस लावून पळवून नेल्याचा गुन्हा नोंदवला आहे. मारेगाव पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत.


