राज्यातील १०,००० सहाय्यक कृषि अधिकाऱ्यांचा एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री मदत निधीसाठी
सुरेश पाचभाई मारेगाव
मारेगाव: महाराष्ट्र राज्यात अतिवृष्टी व पुरामुळे शेतकरी बांधवांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पिकांचे, शेतजमिनींचे, जनावरांचे व घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन शेतकऱ्यांवर उपजीविकेचे गंभीर संकट कोसळले आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्र राज्य सहाय्यक कृषि अधिकारी संघटना यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे.
संघटनेच्या वतीने राज्यातील तब्बल १०,००० सहाय्यक कृषि अधिकाऱ्यांनी सप्टेंबर २०२५ महिन्याचे एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री मदत निधीत जमा करण्याचा ठराव केला आहे. या निर्णयामुळे अंदाजे कोट्यवधी रुपयांची मदत थेट पुरग्रस्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार आहे.
संघटनेचे अध्यक्ष विलास रिटे आणि सरचिटणीस महेंद्र गजभिये यांनी निवेदनाद्वारे सांगितले की,“कर्मचारी म्हणून केवळ प्रशासकीय जबाबदारी पार पाडणे पुरेसे नाही; तर शेतकरी बांधवांच्या दुःखामध्ये खऱ्या अर्थाने सहभागी होणे हीच आमची नैतिक जबाबदारी आहे.”

सहाय्यक कृषि अधिकारी हे केवळ पंचनामे, सर्वेक्षण, डेटा संकलन व अहवाल तयार करण्यातच नव्हे तर शेतकऱ्यांच्या संकटात प्रत्यक्ष सहभागी होण्यास सदैव तत्पर आहेत. त्यामुळे पुरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री मदत निधीत देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
या संदर्भातील निवेदन कृषि मंत्री मा. दत्तात्रय भरणे यांच्याकडे सादर करण्यात आले असून, याची प्रत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच संबंधित वरिष्ठ अधिकार्यांना पाठवण्यात आली आहे.
शेतकऱ्यांच्या सुखदुःखात सहभागी होण्याची परंपरा कायम ठेवत सहाय्यक कृषि अधिकाऱ्यांनी दाखवलेली सामाजिक बांधिलकी ही महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी ठरणार आहे.


