काँग्रेसकडून तहसिलदारामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन
ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी
झरी जामणी : सततच्या पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पैनगंगा नदीच्या पुरामुळे नदीखोऱ्यातील शेती खरडून गेली असून पिके वाहून गेली आहेत. शेतात पाणी साचल्याने पिके पिवळी पडली, वाढ खुंटली तर कापूसपिक वाऱ्यामुळे आडवे झाले आहे. शेतकऱ्यांचा सर्व मजुरी, बियाणे, फवारणी व खताचा खर्च वाया गेला असून पदरात काहीच पडण्याची शक्यता नाही.
कापूस, सोयाबीन, तूर या खरिपातील प्रमुख पिकांवर मोठा फटका बसला असून शेतकरी हवालदिल झाला आहे. या परिस्थितीत शासन व प्रशासन कोणती ठोस पावले उचलताना दिसत नसल्याने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी काँग्रेसकडून पुढाकार घेण्यात आला.

आज तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसिलदारामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले. यामध्ये पूरग्रस्तांना हेक्टरी ७५ हजार रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी, संपूर्ण तालुका ‘ओला दुष्काळ’ म्हणून घोषित करावा, सर्व पिक विमा शेतकऱ्यांना लागू करावा अशी मागणी करण्यात आली. तसेच येणाऱ्या रब्बी हंगामासाठी दोन क्विंटल चणा बियाणे शंभर टक्के अनुदानावर देण्यात यावे, निराधारांना थकित वेतन त्वरित जमा करावे अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या.
या वेळी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संदीप बुर्रेवार, माजी समाजकल्याण सभापती प्रकाशभाऊ कासावार, भुमारेड्डी बाजन्लावार, नंदू किनाके, गंगाधर आत्राम, सुरेंद्र गेडाम, केशव लक्षेट्टीवार, दिवाकर पुसाम, नितीन खडसे, राजू आस्वले, रवी ढेंगळे, हरिदास गुर्जलावार, महेश मोहुर्ले, दादा राऊत, दत्ता परचाके, संतोष जगणाडे, पवण मरचापे, रामचंद्र वडस्कर यांच्यासह अनेक कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.


