सुरेश पाचभाई, मारेगाव
मारेगाव:महाराष्ट्र शासनाच्या आदेशान्वये दिनांक २६ सप्टेंबर २०२५ रोजी कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, मारेगाव येथे महाविद्यालयीन स्तरावरील विज्ञान प्रदर्शनाचे भव्य आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनात इयत्ता ११ वी व १२ वीतील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवत विविध नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर केले.
या विज्ञान प्रदर्शनाचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष श्री. नरेंद्र पा. ठाकरे यांनी भूषविले. आपल्या भाषणात ते म्हणाले, “आजच्या काळात विज्ञान व तंत्रज्ञानाच्या साहाय्याने समाजातील अनेक समस्या सोडवता येऊ शकतात. विद्यार्थ्यांनी सादर केलेले प्रकल्प त्यांच्या कल्पकतेचा आणि कर्तृत्वाचा उत्तम नमुना आहेत. भविष्यात या तरुण पिढीकडून संशोधन व नवकल्पना क्षेत्रात मोठे योगदान मिळेल, असा मला विश्वास आहे.”

महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. हेमंत चौधरी यांनीही विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करताना सांगितले की, “विद्यार्थ्यांनी दाखवलेला उत्साह स्तुत्य आहे. अशा उपक्रमांमुळे ज्ञानसंपदेबरोबरच सृजनशीलता व संशोधनवृत्ती वाढीस लागते. महाविद्यालय सदैव अशा विज्ञानवर्धक उपक्रमांना प्रोत्साहन देत राहील.”
विद्यार्थ्यांचे प्रकल्प
इयत्ता ११ वी : विराज वासेकर, पियूष पायघन, विवेक मिलमिले, कु. श्रुती अवताडे, कु. श्रुती फोपरे
प्रकल्प : हायड्रो इलेक्ट्रिसिटी, एअर क्युरिफायर, प्रकाश संश्लेषन
इयत्ता १२ वी : कु. गायत्री गुरुनूले, कु. स्वाती दहेकर, कु. पायल पडवेकर, कु. पल्लवी भुसारी, कु. श्रेया आलिया
प्रकल्प : सेन्सर स्ट्रीट लाईट, पिरिऑडिक टेबल, डीएनए स्ट्रक्चर
विद्यार्थ्यांचे प्रकल्प नाविन्यपूर्णतेबरोबरच विज्ञानावरील त्यांची जिज्ञासा व संशोधन वृत्ती अधोरेखित करणारे ठरले. अनेक प्रकल्प समाजातील समस्यांवर तंत्रज्ञानाद्वारे उपाय शोधण्याचा प्रयत्न दर्शवित होते.

या प्रदर्शनात परीक्षक म्हणून प्रा. हेमंत चौधरी, प्रा. संगीता आवारी, प्रा. सोनल कुचनकर, प्रा. अनुष्का ठाकरे, प्रा. हर्षाली वासाडे व प्रा. वैभव झाडे यांनी कार्य केले. प्राध्यापकवृंद, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विज्ञान प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
अशा विज्ञान प्रदर्शनांतून विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, वैज्ञानिक विचारसरणी, संशोधनाची आवड व समस्या सोडवण्याची क्षमता विकसित होत असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले. महाविद्यालयाच्या या उपक्रमामुळे विज्ञानस्नेही वातावरण निर्माण झाले असून भविष्यात विद्यार्थी नवनवीन संशोधन व समाजोपयोगी तंत्रज्ञानात सक्रिय सहभाग घेतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.


