सुरेश पाचभाई | मारेगाव
Minor girl raped during Pandhardevi Yatra; Accused arrested
मारेगाव तालुक्यातील प्रसिद्ध पांढरदेवी यात्रेदरम्यान एका गावातील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. ही घटना काल बुधवार दि.22 ऑक्टोबर रोजी दुपारी चारच्या सुमारास पांढरदेवी येथील पाण्याच्या टाकीजवळील जंगल परिसरात घडली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीस अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका गावातील पीडित मुलगी आपल्या तीन मैत्रिणींसह यात्रेसाठी गेली होती. गर्दीच्या गडबडीत ती मैत्रिणींपासून वेगळी झाली. त्याचवेळी कैलास सुर्यभान आत्राम (वय 28, रा. आवळगाव, ता. मारेगाव) या युवकाने तिचा हात पकडून तिला जंगलात नेले व तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला, असा आरोप आहे.
घटनेनंतर पीडित मुलगी रडत रडत रस्त्यावर आली व तिथे भेटलेल्या आपल्या काकांना तिने सर्व प्रकार सांगितला. काकांनी तात्काळ पालकांना कळवून सर्वजण मारेगाव पोलीस ठाण्यात दाखल झाले.
या प्रकरणी मारेगाव पोलिसांनी कलम 64, 96 बीएनएस तसेच बालक लैंगिक अत्याचार प्रतिबंधक (POCSO) कायद्यातील कलम 4 व 6 अंतर्गत गुन्हा नोंदवून आरोपी कैलास आत्राम यास अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी दळवे (वणी विभाग) यांनी घटनास्थळाची पाहणी केली. यात्रास्थळी या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.


