रोहपट (डुबली पोड) येथील घटना
सुरेश पाचभाई, मारेगाव
मारेगाव तालुक्यातील रोहपट (डुबली पोड) येथील भीमा तुकाराम आत्राम (वय ६१) या शेतकऱ्याने अतिवृष्टीमुळे शेतीचे झालेले नुकसान आणि आर्थिक अडचणींमुळे नैराश्येतून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी (दि. २७ ऑक्टोबर २०२५) सकाळी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, भीमा आत्राम हे शेतीवर उदरनिर्वाह करणारे परिश्रमी शेतकरी होते. सोमवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे शेतात गेले होते. काही वेळानंतर घरी आले व मुलांना सांगितले यावर्षी शेतातील पिकांचे काही खरे नाही असे म्हणून जमिनीवर कोसळले असता मृतक यांना झालेल्या उलटीचा कीटकनाशकाचा वास येत असल्याने त्यांना कुटुंबीयांनी त्यांना तात्काळ मारेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

भीमा आत्राम यांच्या ताब्यात सुमारे सात एकर शेती होती. यंदाच्या अतिवृष्टीमुळे त्यांच्या शेतातील सर्व पीक पूर्णतः नष्ट झाले होते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ते आर्थिक संकटात आणि मानसिक तणावाखाली होते, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.
मृत भीमा तुकाराम आत्राम यांच्या पश्चात एक मुलगा, सून आणि नातवंड असा आप्तपरिवार आहे. या घटनेमुळे रोहपट परिसरात शोककळा पसरली असून, स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांनी प्रशासनाकडे शोकाकुल कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.


