सुरेश पाचभाई मारेगाव
मारेगाव येथील नव्या बसस्थानकाचे बांधकाम गेल्या सहा महिन्यांपासून बंद असल्यामुळे नागरिक व प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या संदर्भात आज ४ नोव्हेंबर २०२५ रोजी तहसील कार्यालय मारेगाव तसेच सार्वजनिक बांधकाम उपविभाग मारेगाव यांच्या मार्फत जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे लेखी निवेदन देण्यात आले.
हे निवेदन कॉ. बंडु गोलर (भा.क.प.) यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. बसस्थानकाचे उद्घाटन झाल्यानंतर काम जलद गतीने सुरू होते; मात्र अचानक काम थांबविण्यात आले. त्यामुळे बसस्थानकाचा वापर करणाऱ्या प्रवाशांची सतत हेळसांड होत असल्याची तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
बांधकाम सुरू न होण्यामुळे प्रवाशांना पावसात, उन्हात उभे राहून वाहनांची प्रतीक्षा करावी लागते. सोयीसुविधांचा पूर्ण अभाव आहे. संबंधीत अधिकाऱ्यांनी तातडीने काम सुरू करून बसस्थानक जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध करावे, अशी मागणी निवेदनातून केली आहे.
निवेदनात प्रशासनास सात दिवसांचा अल्टीमेटम देण्यात आला असून, या कालावधीत बसस्थानकाचे काम पुन्हा सुरू न झाल्यास तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
स्थानिक नागरिक, प्रवासी व व्यावसायिकांमधून बसस्थानकाच्या प्रलंबित कामाबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे.


