सुरेश पाचभाई मारेगाव
मारेगाव तालुक्यातील खैरगाव (बुटी) येथे गुरुवारी संध्याकाळी एका शेतकऱ्याने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. गुणवंता अजाब कुमरे (वय अंदाजे 48) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
प्राथमिक माहितीनुसार, कुमरे हे आपल्या नावावर असलेल्या सुमारे चार एकर शेतीवर काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास ते शेताजवळील पायदळ मार्गावर बेशुद्ध अवस्थेत आढळले. नातेवाईक आणि ग्रामस्थांनी त्यांना तातडीने मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात हलवले; मात्र डॉक्टरांनी तपासणीदरम्यान त्यांना मृत घोषित केले.
बातमी लिहेपर्यंत आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झाले नव्हते. सदर प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार श्याम वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली दिगंबर किनाके करीत आहेत.
या घटनेनंतर गावात हळहळ व्यक्त होत असून सामाजिक संस्था, शेतकरी संघटना आणि ग्रामस्थांनी कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत.


