सुरेश पाचभाई, मारेगाव
मारेगाव तालुक्यातील चोपण गावात पारंपरिक काकड आरतीच्या निमित्ताने गेल्या काही दिवसांपासून गावामध्ये भक्तिभावाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. पहाटेच्या अल्लड गारव्यात “उठा उठा हो सकळीक, वाचे स्मरावा गजमुख…” या भजनाने सुरू होणारी काकड आरती गावाच्या सांस्कृतिक व धार्मिक परंपरेचे दर्शन घडवत आहे.
अश्विन पौर्णिमेपासून सुरू झालेली ही आरती कार्तिक पौर्णिमेपर्यंत चालणार आहे. दररोज पहाटे सुमारे ४.४५ वाजता गावातील गंगाराम महाराज मंदिरामध्ये भाविक प्रथम दर्शन घेतात. त्यानंतर टाळ–ढोलकीच्या नादात भूपाळी म्हणत संपूर्ण गावामध्ये आरती मिरवली जाते. त्यामुळे पहाटेच्या वेळेस गावात मंगल आणि आध्यात्मिक वातावरणाची अनुभूती होते.

विशेष म्हणजे चोपण येथील काकड आरतीची परंपरा तब्बल १५० वर्षांहून अधिक जुनी असून आजही गावकरी ही परंपरा जपून ठेवत आहेत. सार्वजनिक काकड आरतीबरोबरच काही घरगुती काकड आरतीही केली जाते. या आरतीमध्ये गावातील लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून येतो.
कार्तिक पौर्णिमेदिवशी काकडा नदीच्या प्रवाहात आरतीचे प्रतीकात्मक विसर्जन करून या धार्मिक उपक्रमाची सांगता केली जाते. या परंपरेमुळे गावात सामाजिक एकात्मता आणि अध्यात्माचा सुंदर संगम अनुभवायला मिळत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.


