– तालुका कृषी अधिकारी यांचे आवाहन
सुरेश पाचभाई, मारेगाव
मारेगाव : यंदा रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण निर्माण झाले असले, तरी सततच्या पावसामुळे शेतीचे नियोजन विस्कळीत झाले आहे. खरीप हंगामात अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी आता रब्बी हंगामातून नुकसान भरून काढण्याच्या तयारीत आहेत. तथापि, या पावसाळी परिस्थितीमुळे रब्बी हंगाम नेहमीपेक्षा उशिरा सुरू झाला असून, उत्पादनावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे.
या पार्श्वभूमीवर तालुका कृषी अधिकारी दिपाली खवले यांनी शेतकऱ्यांना हरभऱ्यावर मर रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बीजप्रक्रिया करूनच पेरणी करण्याचे आवाहन केले आहे.
कृषी विभागाने मारेगाव तालुक्यात यंदा एकूण ६,७८० हेक्टर क्षेत्रात रब्बी पिकांच्या पेरणीचे उद्दिष्ट ठेवले आहे. यात गहू, रब्बी ज्वारी आणि हरभरा या प्रमुख पिकांना प्राधान्य देण्यात आले आहे. सततच्या पावसामुळे जमिनीत ओल जास्त असल्याने बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. हरभरा पीक ‘फ्युजारियम ऑक्सिसफोरम’ या बुरशीमुळे होणाऱ्या मर रोगाला विशेषतः बळी पडते. त्यामुळे पिकाची फेरपालट (Crop Rotation) करणेही फायदेशीर ठरते, असेही विभागाने नमूद केले आहे.

खवले यांनी सांगितले की, “जमिनीत विविध बुरशीजन्य किडींची बिजाणे सुप्तावस्थेत राहतात. तसेच रोगांचा प्रसार जमीन व बियाण्यांद्वारे होतो. त्यामुळे बीजप्रक्रिया हा त्यावर सर्वोत्तम उपाय आहे. बीजप्रक्रिया केल्याने उगवणीच्या व प्राथमिक वाढीच्या अवस्थेत पिकावर होणाऱ्या कीडरोगांचा प्रादुर्भाव टाळता येतो.”
कृषी विभागाने शेतकऱ्यांना मर रोगाला प्रतिकारक्षम हरभरा वाणांची निवड करण्याचे आणि पेरणीपूर्वी योग्य ती बीजप्रक्रिया करूनच पेरणी करण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून रब्बी हंगामात चांगले उत्पादन मिळू शकेल.


