तुळशीराम बारजवळ भीषण अपघात; परिसरात हळहळ
सुरेश पाचभाई, मारेगाव
मारेगाव : मारेगाव–वणी राज्य महामार्गावरील तुळशीराम बारसमोर शनिवारी (१५ नोव्हेंबर) रात्री साडेआठच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
मृतांमध्ये गौरव बापूराव आत्राम (२१, रा. गौराळा) व नमेश्वरी राजेंद्र हनुमंते (१७, रा. बोपापूर कायर, ह.मु. मारेगाव) यांचा समावेश आहे. दोघेही स्कूटीने वणीहून मारेगावकडे येत असताना विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर ट्रकने स्कूटीला समोरून जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की स्कूटी ट्रकच्या चाकाखाली अडकून काही मीटरपर्यंत ओढली गेली. त्यामुळे दोघांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर महामार्गावरील नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. दोघांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र तपासणीअंती डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. माहिती मिळताच मारेगाव पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.या अपघाताचा पुढील तपास मारेगाव पोलिस करीत आहेत.


