पावसाचा अभाव व धुळ पेरण्याला जोरात सुरुवात.
मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]
मारेगाव तालुक्यात आत्तापर्यंत मान्सून पुर्व पाऊस जिकडे पडला तिकडे पडत आहे पण काही भागात अजुनही एकही पाऊस झाला नाही.व पेरणीसाठी लागणारा मृग नक्षत्राचा सुध्दा दमदार पाऊस पडला नाही पण शेतकऱ्यांनी धुळ पेरणीला जोरात सुरुवात केली आहे. शेतकरी आकाशाकडे डोळे लावून पावसाची प्रतीक्षा करीत असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे.
मृग नक्षत्राची शेतकरी आतुरतेने वाट बघत असतो. मृग नक्षत्र लागताच शेतकरी पेरणी करीत असतो. अनेक शेतकरी रोहिणी नक्षत्रामध्येच जमीनीची मशागत करतो व नांगरून, वखरून पेरणीयोग्य करून ठेवतात. काही शेतकरी तर रोहिणी नक्षत्रामध्येच धूळ पेरणी करून उत्पन्न घेत असतात. परंतु मागील दोन वर्षांचा अनुभव पाहता ज्यांच्याकडे ओलितांची सोय नाही ते धूळ पेरणी करायचा विचारच करत नाही.

कारण मागील दोन वर्षे अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणी तसेच तीबार पेरणीचे संकट ओढवले होते. आणि एवढे करूनही उत्पन्न काय तर घाटाच. या वर्षी पावसाला लवकर सुरुवात होणार असल्याचे वर्तविण्यात आले. परंतु अजुन तालुक्यात पाहिजे तसा पाऊस नसल्याने शेतकरी पावसाची प्रतीक्षा करीत आहेत.
मागील दोन वर्षे पडलेला सततचा दुष्काळ त्यामुळे आणि त्यातच झालेली नापिकी या सर्व कटुअनुभवातून शेतकरी यावर्षी पाऊल जपून टाकताना दिसत आहे. शेतकऱ्यांच्या मागचे दुष्काळाचे संकट संपायचे नाव घेत नाही. तालुक्यात बऱ्याचशा शेतकऱ्यांनी पाऊस येणारच असल्याचे गृहीत धरुन धुळ पेरणीस जोरात सुरुवात केली असुन एकुुणच सध्यातरी तालुक्यातील शेतकरी मात्र आता आकाशाकडे टक लावून वरुण राजाच्या प्रतिक्षेत आहे.