बातमी ऐका (Marathi Voice Reader)
संकेत वरक, प्रतिनिधी, मुंबई: मागील काही महिन्यांपासून अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) चांगलंचं अॅक्शन मोडमध्ये आले आहे. तुर्भे आणि नवी मुंबई परिसरात अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि मध्यवर्ती गुन्हे शाखेने एक अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आणला आहे. मुदतबाह्य (Expired) अन्नपदार्थांच्या लेबल्समध्ये फेरफार करून त्यांची पुन्हा विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. लोकांच्या आरोग्याशी खेळण्याचा हा डाव उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
एफडीएच्या कारवाईत तब्बल ७५ लाख २९ हजार २६१ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी तुर्भे पोलीस ठाण्यात एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला असून संबंधित आस्थापनांचा अन्न परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला आहे.
मुदतबाह्य अन्नाचे ‘री-पॅकिंग’; २५ लाखांचा माल जप्त
२४ ऑगस्ट ते २९ ऑगस्ट २०२६ दरम्यान अन्न व औषध प्रशासन आणि गुन्हे शाखेने संयुक्तपणे ही धडक कारवाई केली. तपासादरम्यान गोदामांमध्ये उत्पादनांवर असलेली ‘उत्पादन तारीख’ आणि ‘मुदत संपण्याची तारीख’ बदलून नवीन लेबल्स लावली जात असल्याचे उघडकीस आले. या छाप्यांमध्ये १० नामांकित निर्यातदार कंपन्यांशी संबंधित अन्नपदार्थांचे तब्बल ४,४११ कार्टन, तसेच विनालेबल आणि मुदतबाह्य माल जप्त करण्यात आला.
पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल
नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळणाऱ्या या प्रकरणी अन्न सुरक्षा व मानके कायदा आणि भारतीय न्याय संहितेअंतर्गत तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफडीएने या कारवाईत सहभागी असलेल्या गोदाम आणि आस्थापनांचा परवाना तात्काळ प्रभावाने निलंबित केला आहे.