बातमी ऐका (Marathi Voice Reader)
सोलापूर – घरात कुणी नसताना एका असहाय्य, मुकबधिर अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटनेनं सोलापूर हादरलं होतं. आता या प्रकरणात 55 वर्षीय नराधमाला न्यायालयाने जन्माची अद्दल घडवली आहे. आरोपी अजीज अहमद गुलाम दस्तगीर शेख याला सोलापूर सत्र न्यायालयाने आजन्म सश्रम कारावास आणि दंडाची कठोर शिक्षा सुनावली. या निर्णयामुळे पीडित अल्पवयीन मुलीला अखेर न्याय मिळाला आहे.
नेमकी घटना काय?
सोलापुरात 25 जुलै 2022 रोजी दुपारी एक भयंकर घटना घडली होती. पीडित मुकबधिर मुलगी तिच्या आजीसोबत घरी असताना आरोपी अजीज शेख तिथे आला. आजीने स्पष्ट विरोध केला असतानाही तो तिला ‘थोड्या वेळासाठी घेऊन जातो’ असे सांगून जबरदस्तीने स्वतःच्या घरी घेऊन गेला. आरोपीच्या घरी त्यावेळी कुणीही नव्हते. त्याने घराचा दरवाजा आतून लावून घेत चिमुकलीवर जबरदस्तीने अत्याचार केला. इतकेच नव्हे तर, कोणाला काही सांगितल्यास मारून टाकण्याची धमकी देत तिचे चिमटे काढून तिला घाबरवण्याचा प्रयत्न केला.
26 वर्षांची महिला, नृत्याचे कार्यक्रम करायची अन्…, पोलीस शेतकऱ्याच्या वेशात गेले, भयंकर कांड समोर
घटनेनंतर पीडित मुलीने अत्यंत धैर्याने घराबाहेर येऊन रडत-रडत आजीला इशाऱ्यांद्वारे स्वतःवर झालेला भयानक प्रकार समजावून सांगितला. मुलीचे वडील कामावरून घरी आल्यानंतर त्यांनी तातडीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.
न्यायालयाचा निकाल आणि सुनावलेली शिक्षा
या गंभीर प्रकरणाची सुनावणी सत्र न्यायाधीश जे. जे. मोहिते यांच्या न्यायालयात पार पडली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि पोलिसांनी सादर केलेले सबळ पुरावे ग्राह्य धरून आरोपी अजीज शेख याला दोषी ठरवले. न्यायालयाने आरोपीला आजन्म सश्रम कारावास आणि 10 हजार रुपये दंड, 3 वर्षे कारावास आणि 2 हजार रुपये दंड, 2 वर्षे कारावास आणि 1 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त 3 महिने कारावासाची शिक्षा भोगावी लागेल.
पोलीस पथकाची कामगिरी
एमआयडीसी पोलीस ठाण्याचे तत्कालीन साहाय्यक पोलीस निरीक्षक वैजनाथ कुकडे यांनी या प्रकरणाचा अत्यंत सखोल तपास करून न्यायालयात मजबूत पुरावे सादर केले. सरकारी पक्षातर्फे ॲड. डोके यांनी प्रभावीपणे युक्तिवाद मांडला. तसेच कोर्ट पैरवी म्हणून दोषसिद्धी कक्षातील सपोनि राजेश डाकेवाड, महिला पोलीस अंमलदार मैंदाड आणि महिला पोलीस हवालदार बेटकर यांनी प्रकरणात विशेष पाठपुरावा केला. या कठोर निर्णयामुळे गुन्हेगारांमध्ये धास्ती निर्माण झाली असून पीडितेला अखेर न्यायाचा दिलासा मिळाला आहे.