पाच तोळे सोने लंपास.
मारेगाव शहरातील प्रभाग क्र.6 मधील घटना.
मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]
सविस्तर वृत्त असे की.
मारेगाव येथील एका सेवानिवृत्त शिक्षकाच्या घरी दोघे जण गेले.सोन्याचे दागिने साफ करून देतो म्हणून सोने घेऊन ते त्यांच्याच घरातील कूकरमध्ये टाकले.आणि थोडावेळ गरम होऊ द्या.आम्ही पाच मिनिटात येतो असे सांगून त्यांच्या घरातील सुमारे पाच तोळे सोन्यावर चोरट्यानी डल्ला मारल्याची घटना मारेगाव शहरात घडली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून या चोरट्याना पकडण्याचे मोठे आव्हान मारेगांव पोलिसांसमोर आहे.
आज दिनांक 23 सप्टेंबर 2022 शुक्रवारला मारेगाव शहरात सकाळी 10 वाजताच्या सुमारास मारेगाव शहरातील प्रभाग क्र.6 मधील एका सेवानिवृत्त शिक्षक शंकर गारघाटे वय सुमारे 80 वर्षे यांचे घरी दोन अज्ञात इसमानी त्यांचे घरात प्रवेश केला. त्यांना आम्ही सोने साफ करणारे आहोत. तुमच्या घरातील सोनेही आम्ही साफ करून देतो असे सांगितले. गारघाटे यांचा मुलगा आणि सून नोकरीकरिता बाहेर गेले होते.
अशातच सोने साफ होईल म्हणून गारघाटे यांनी घरी आलमारीमध्ये ठेऊन असलेली अंगठी, चपलाकंठी आणि बांगडी या चोरट्यांच्या हातात दिली. त्यांनी घरातील कूकरमध्ये हे गरम होईपर्यंत ठेवायला सांगितले. घरच्यांनी विश्वासाने ते कूकर गॅसवर ठेवले. तेवढ्यात या चोरट्यांनी आम्ही पाच मिनिटात येतो असे सांगितले. घरच्यांना विश्वास होता की, सोने हे कूकरमध्ये आहे. परंतु काही वेळ गेल्यानंतरही हे दोन्ही इसम घरी न आल्याने त्यांनी कूकर बंद करून उघडून बघितले. तर त्यातून सोने गायब.
आपली फसवणूक झाली हे लक्षात येताच गारघाटे परिवाराने तात्काळ पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. दोन्ही संशयित हे अंदाजे 45 वर्षाच्या सुमारास असावे. यावरून मारेगाव पोलिसांनी कलम 466 (34) नुसार गुन्हा दाखल केला असून ठाणेदार राजेश पुरी यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर सावंत आणि जमादार आनंद अलचेवार पुढील तपास करीत आहे.