बातमी ऐका (Marathi Voice Reader)
सांगली : हवामानातील बदल, शेती मालाच्या दराची अनिश्चितता आणि भांडवलाच्या समस्येने शेतकऱ्यांना वेठीस आणले आहे. मात्र बचत गटाच्या माध्यमातून डीहायड्रेशन प्रक्रियेद्वारे शेतातील नाशवंत भाजीपाल्याचा टिकाऊपणा वाढवत सांगलीच्या शेटे दाम्पत्याने उद्योगामध्ये यश संपादित केले आहे. यामधून महिन्याला 2 लाखांची कमाई केली आहे.
सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील बांबवडे गावामध्ये नऊ एकर शेती पिकवणारे शेटे कुटुंब आहे. शेतामध्ये ऊसासह फळे, भाजीपाला पिकवतात. मात्र इतर शेतकऱ्यांप्रमाणे त्यांनादेखील अनेकदा बाजारभावाच्या समस्येचा फटका सोसावा लागला. शेतकऱ्याचे पिक बाजारात पोहचण्यावेळी कोलमडणारे बाजारभाव मेहनतीवर पाणी फिरवणारे ठरले. यावर उपाय शोधता-शोधता शेटे दापत्याला शेतमालाच्या डीहायड्रेशन प्रक्रियेची माहिती मिळाली.
पपई शेतीचं धाडस दाखवलं, आता 10 लाखांची निव्वळ कमाई, सोलापूरच्या शेतकऱ्यानं सांगितला यशस्वी शेतीचा मंत्र
अनुभवातून घेतले धडे
सुरुवातीला त्यांनी नैसर्गिक उन्हामध्ये कांदा, टोमॅटो सुकवून पाहिले. पुढे मोबाईलच्या मदतीने डीहायड्रेशन प्रक्रियेचे अधिक माहिती घेताना ‘सोलर ड्रायर’ तंत्रज्ञान समजले. सुरुवातीला काही काळ सोलर ड्रायर वापरले परंतु ते पुरेसे नसल्याचा अनुभव उद्योजिका अनिता सांगतात. त्यानंतर इलेक्ट्रिक ड्रायर या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळाली. आणि त्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानासह कौशल्य आत्मसात करण्याचा निर्णय घेतला. भाजीपाला आणि फळे वाळविताना तापमानाचे अचूक नियंत्रण, सुकविण्यासाठी लागणारा कालावधी, रंग-चव टिकविण्याच्या पद्धती, स्वच्छता आणि दर्जा राखण्याचे निकष अभ्यासले. गुणवत्ता आणि सातत्य असेल, तर प्रक्रिया केलेल्या उत्पादनाला बाजारात चांगली मागणी असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
अशी केली सुरुवात
अनिता यांनी सन 2023 मध्ये स्वामिनी उद्योग समूह या नावाने डीहायड्रेशन व्यवसायाचा प्रवासाला सुरूवात केली. सुरुवातीला प्रयोग म्हणून वीस पंचवीस किलो भाजीपाल्यावर प्रक्रिया करत होते. कडक उन्हावर अवलंबून असलेल्या सोलर ड्रायरमुळे कामाला हंगामी मर्यादा होती. उन्हाळा आला की गती आणि इतर वेळी प्रक्रिया थांबवावी लागत असे. त्यामुळे इलेक्ट्रिक ड्रायर खरेदी करण्याचा विचार त्यांच्या मनात आला. सध्या त्यांच्याकडे सहा ड्रायर आहेत. नवीन यंत्रसामग्रीमुळे कामाला गती मिळाल्याचे दत्तात्रय शेटे सांगतात. तसेच प्रक्रिया अधिक सुलभ आणि जलद झाली.
शासनाकडे नोंद
मागील वर्षी त्यांनी स्वामिनी उद्योग समूहाची एफएसएसएआयसाठी शासनाकडे नोंद केली. तसेच महिला बचत गटाच्या माध्यमातून त्यांना उद्योग उभारणी आणि मार्केटिंगसाठी मदत मिळाल्याचे अनिता सांगतात. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) या योजनेने दिशी दिली. जिल्हा परिषदेमार्फत राबविल्या जाणाऱ्या या उपक्रमामुळे बाजारपेठ मिळाली. प्रदर्शनांच्या माध्यमातून उत्पादनांना थेट ग्राहकांपर्यत पोहोचण्याची संधी मिळाली आणि मागणी वाढली.
उद्योजक आणि प्रशिक्षक
एक दोन प्रकारच्या भाजीपाल्यापासून केलेली सुरुवात आज सत्तर प्रकारच्या प्रॉडक्ट पर्यंत पोहोचली आहे. तसेच मार्केटचे कोणतेही ज्ञान नसताना सुरू झालेला प्रवास सहा वर्षांमध्ये यशस्वी उद्योजक होण्यापर्यंत पोहचला आहे. डीहायड्रेशन उद्योगांमध्ये सहा वर्षांचा अनुभव गाठीशी बांधून ते इतरांना देखील प्रशिक्षण देतात. शेतकरी ते यशस्वी उद्योजक बनवण्याचा शेटे दाम्पत्याचा प्रवास नवी स्वप्न पाहणाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरतो आहे.