बातमी ऐका (Marathi Voice Reader)
बदलापूर: बदलापूर पश्चिमेकडील रमेशवाडी परिसरातील शिवसेना जनसंपर्क कार्यालयाबाहेर मध्यरात्री धक्कादायक घटना घडली. एका तरुणावर सपासप वार करण्यात आले. या घटनेने बदलापूरमध्ये एकच खळबळ उडाली.
एका ३० वर्षीय तरुणाची पूर्ववैमनस्यातून ही अत्यंत निर्घृणपणे धारदार शस्त्रांनी वार करून हत्या करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. रविवारी मध्यरात्री घडलेल्या या थरारक हल्ल्यात मृताचा मित्र गंभीर जखमी झाला असून, याप्रकरणी पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे संपूर्ण बदलापूर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेशवाडी येथील शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयाबाहेर रात्री सुमारे १ वाजण्याच्या सुमारास ही रक्ताने थारोळलेली घटना घडली. गणेश यादव आणि त्याचा मित्र अबू हलाल शेख हे दोघे त्या ठिकाणी असताना अचानक काही हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी बेछूट वार केले. या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या गणेश यादवचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा साथीदार अबू हलाल शेख गंभीर जखमी झाला आहे. त्याला तात्काळ उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी पोलिसांनी अवनीश सिंग आणि संदीप सिंग या दोघा संशयितांना तात्काळ ताब्यात घेतले आहे. सहाय्यक पोलिस आयुक्त शैलेश काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश यादव आणि या संशयित आरोपींमध्ये २०२२-२३ या कालावधीत जुना वाद झाला होता. त्या काळात दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाली असून, त्यासंदर्भात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. याच जुन्या वैमनस्याचा बदला घेण्यासाठी हा भयंकर हल्ला करण्यात आला का, या दिशेने आता बदलापूर पोलीस कसून तपास करत असून उर्वरित फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे.