ठाणेदार सागर दानडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील प्रमुख मार्गांवर पोलिसांचे संचलन; शांतता व सुरक्षिततेचा संदेश
सुरेश पाचभाई मारेगाव
मारेगाव दसरा सण आणि दुर्गादेवी विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना दृढ व्हावी, या उद्देशाने मंगळवार, २० ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ४.३० वाजता मारेगाव पोलीस स्टेशनच्या वतीने शहरात रूट मार्च काढण्यात आला.ठाणेदार सागर दानडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या संचलनातून पोलिसांच्या सज्जतेचे दर्शन घडले.
या रूट मार्चमध्ये पोलीस उपनिरीक्षक रवी बोरकुले, पोलीस कर्मचारी, महिला पोलीस कर्मचारी तसेच होमगार्ड सहभागी झाले होते. शिस्तबद्ध पद्धतीने पार पडलेल्या या संचलनामुळे शहरातील प्रमुख मार्गांवर पोलीस बंदोबस्ताची उपस्थिती दिसून आली.
प्रमुख मार्गांवरून संचलन
मारेगाव पोलीस स्टेशन परिसरातून रूट मार्चला सुरुवात झाली. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, गोशिया मस्जिद चौक, कलाम चौक, जुनी वस्ती, नगरपंचायत चौक आणि मार्डी चौक या प्रमुख भागांतून पोलिसांनी संचलन केले. शहरातील विविध भागांतून मार्गक्रमण केल्यानंतर पुन्हा मारेगाव पोलीस स्टेशन येथे रूट मार्चची सांगता करण्यात आली.

दसरा सण आणि दुर्गादेवी विसर्जनाच्या काळात नागरिकांनी शांतता, संयम आणि सामाजिक सलोखा राखत सण उत्साहात साजरा करावा, हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे या संचलनातून अधोरेखित झाले. सण-उत्सव शांततेत पार पडण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे.