देवाळा येथील घटना
सुरेश पाचभाई मारेगाव
मारेगांव तालुक्यातील देवाळा येथील गावाजवळ विज पडून बैलाचा मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक 22 मे 2024 रोज बुधवारला दुपारी 3 ते 3.30 वाजताच्या सुमारास घडली.वीज पडून बैल मरण पावल्याने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे.
बैल मृत झालेल्या शेतकऱ्याचे नाव विठ्ठल शामराव निमकर असे आहे.तालुक्यात मागील काही दिवसापासून भर उन्हाळ्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली.आज दि. 22 मेला दुपारी वादळवारा आणि पावसाला सुरुवात झाली.अचानक सुरु झालेल्या पावसामुळे शेतकरी आणि नागरिकांची मोठी धावपळ सुरु झाली.गावातली अनेकांची जनावरे उन्हाळ्याचे दिवस असल्याने शेतामध्ये मोकाट किंवा शेतातील बंड्यामध्येच बांधले जातात.

अशातच आज अचानक दुपारी आकाशात ढग दाटून आले.विजांचा कडकडाट सुरु झाला व सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने दमदार हजेरी लावली.देवाळा येथील विठ्ठल शामराव निमकर यांचेकडे ५ एकर शेती देवाळा शिवारात आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने बैल ते राहत असलेल्या देवाळा येथेच असलेल्या गावातील गोठ्यामध्ये बांधलेले होते.
ह्या शेतकऱ्याच्या एका बैलावर गावातील गोठ्यामध्येच विज कोसळून बैल जागीच ठार झाला.तर दुसऱ्या बैलाचेही थोडे नुकसान झाले.शेतीचा हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. बैल मरण पावल्याने शेतकऱ्याचे अंदाजे 50 हजार रुपयाचे आर्थिक नुकसान झाले आहे. वृत्त लिहिपर्यंत पंचनामा व्हायचा होता. डॉक्टरशी संपर्क केला असता त्यांनी दि.23 ला पंचनामा करायला येतो असे सांगितले.