जगन्नाथ बाबांची पालखी वेगाव येथून पंढरपूरकडे रवाना
सुरेश पाचभाई मारेगाव
विदेही सद्गुरु श्री संत जगन्नाथ बाबा यांची पालखी वेगाव, वणी येथुन पंढरपूरकडे रवाना झालेली आहे. हजारो भाविकांच्या उपस्थितीत मारेगाव येथे आज दि. 6 जून 2025 रोज शुक्रवारला सायंकाळी 7:30 वाजता या पालखी सोहळ्याचे आगमन झाले.

डोळ्यांचे पारणे फिटणारा हा पालखी सोहळा रात्रीच्या वेळेस मारेगाव येथे मुक्कामी असून दि. 7 जूनला पंढरपूरकडे रवाना होणार आहे.दरवर्षी वेगाव,वणी येथील नंदेश्वर देवस्थान येथून जगन्नाथ बाबाची पालखी ही पंढरपूरला जात असते. 3 जूनला वणीवरून निघालेली ही पालखी 3 जुलैला पंढरपूरला पोहोचत असते. या पालखीमध्ये पंढरपूर पर्यंत पायदळ चालण्यासाठी हजारो भाविक या पालखीमध्ये सहभागी होत असतात.
आपला घर संसार बाजूला ठेवून विठूरायाची ओढ भाविकांच्या मनात निर्माण झाल्याने भाविक सगळ्या सुखसोयी मिळत असलेल्या जमान्यामध्ये पायदळ वारी करीत असतात हे या पालखीचे वैशिष्ट्ये आहे.टाळ मृदूंगाच्या गजरात सायंकाळच्या वेळेस वाजत गाजत निघालेल्या या रॅलीमध्ये मारेगाव येथील तसेच परिसरातील हजारो नागरिक या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले होते.

जय जगन्नाथ तसेच पाऊले चालली पंढरीची वाट अशी गाणे म्हणत भक्तगण पायदळ वारीमध्ये चालतानाचे विहंगम दृश्य बघून मारेगावकर मोहित झाले होते.


