सुरेश पाचभाई मारेगाव
मारेगाव: तालुक्यात काही ठिकाणी अल्प प्रमाणात कापूस व सोयाबीन पिकांवर वाणी किंवा पैसा किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.गडद तपकिरी ते काळसर रंगाची दोन ते पाच सेंटीमीटर लांबीची हळूहळू चालणारी व हात लावल्यास गुंडाळणारी वाणी किंवा पैसा ही कीड निशाचर आहे.
ती मुख्यत्वे सेंद्रिय पदार्थावर जगणारी कीड आहे परंतु काही वेळेस कपाशी व सोयाबीन ची कोवळी पाने व शेंडे खातांना आढळून येते.या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आढळून येत असल्यास शेतात गवताचे ढीग करून ठेवावे व सकाळी त्याखाली लपलेल्या अळ्या गोळा करून नष्ट कराव्या.

बिजप्रक्रिया केलेल्या शेतांमध्ये या किडीचा प्रादुर्भाव कमी दिसतो. वारंवार किडीचा प्रादुर्भाव होणाऱ्या शेतात फिप्रोनील, कार्बोसल्फान किंवा क्लोरोपायरिफोस यासारखी दाणेदार ही कीटकनाशके पेरणीआधी जमिनीत मिसळून दिल्यास चांगले परिणाम दिसून आले आहेत.
उगवणीनंतर मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव असल्यास क्लोरोपायरीफोस 20 टक्के प्रवाही 35 ते 38 मिली प्रति 15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. अश्याप्रकारे वाणी/ पैसा किडीचे व्यवस्थापन करण्याचे आवाहन तालुका कृषि अधिकारी मारेगाव सुरेश बुटले यांचेमार्फत करण्यात आले आहे.
याबत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबीर अंतर्गत मार्डी येथे मंडळ कृषि अधिकारी किशोर डोंगरकार यांनी वाणी/ पैसा कीड व्यवस्थापन बाबत शेतकऱ्यांना संबोधित केले. तालुका कृषि अधिकारी कार्यालयातील सहायक कृषी अधिकारी गावोगावी भित्तीपत्रके लावून तसेच सभा घेऊन वाणी/पैसा कीड व्यवस्थापन बाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहे.


