पांदण रस्त्यांची दुरावस्था ; बळीराज्यांचे हाल !

0
558

पांदण रस्त्याच्या योजना कागदावरच

ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी 

झरी जामणी:परिसरातील शेतांना जोडणाऱ्या पांदन रस्त्यांची (शेतरस्त्यांची) स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे.अनेक ठिकाणी हे रस्ते पूर्णपणे उखडले असून, चिखल आणि खड्ड्यांमुळे शेतकऱ्यांना शेतीकामासाठी ये-जा करणे असह्य झाले आहे.

यामुळे बळीराजाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.पावसाळ्यात तर या पांदन रस्त्यांवरून चालणेही मुश्कील होत आहे. चिखलामुळे ट्रॅक्टर, बैलगाडी किंवा इतर शेती अवजारे घेऊन जाणे तर सोडाच, पण पायी चालणेही धोकादायक बनले आहे. शेती अवजारे आणि खते शेतात पोहोचवणे कठीण झाले आहे.चिखलातून चालताना घसरून पडण्याचे, दुखापत होण्याचे प्रकार वाढले आहेत.

खराब रस्त्यांमुळे शेतात पोहोचण्यासाठी जास्त वेळ लागत असून मजूर वर्ग शेतात यायला तयार नाही.या पांदन रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी अनेकदा शेतकऱ्यांनी स्थानिक प्रशासनाकडे निवेदने दिली आहेत. मात्र, त्यांच्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत.

“आम्ही रात्रंदिवस शेतात घाम गाळतो, पण आमच्यासाठी साधा रस्ताही चांगला नाही. प्रशासनाने आमच्याकडे लक्ष द्यावे असा संताप,” एका शेतकऱ्याने व्यक्त केला.

ग्रामीण भागाच्या विकासासाठी चांगले रस्ते आवश्यक आहेत. पांदन रस्त्यांची ही दुरवस्था केवळ शेतकऱ्यांसाठीच नव्हे, तर एकूणच कृषी विकासासाठी मारक ठरत आहे. यामुळे कृषी उत्पादनावर परिणाम होत असून,आधुनिक शेती पद्धतींचा अवलंब करण्यातही अडचणी येत आहेत. रस्त्यालगतच्या अनेक शेतकऱ्यांनी कसलीही मोजणी न करता रस्त्यावर अतिक्रमण केलेले आहे.त्यामुळे इतर शेतकरी या अरुंद व खराब रस्त्यामुळे वर्षानुवर्षे अडचणीत आला आहे.

वेळेवर शेतात पोहचता येत नाहीं. याचा नकारात्मक परीणाम होउन उत्पादनात घट होत असुन. आर्थिक नुकसान सहन करीत आहे. यावर प्रशासनाने स्वतः लक्ष घालून या पांदन रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. या रस्त्यांची डागडुजी करून ते वाहतुकीयोग्य बनवल्यास शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारेल आणि कृषी उत्पादनालाही चालना मिळेल. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा शेतकरी करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here