विजेत्यांना मिळाले चांदीचे नाणे
सुरेश पाचभाई मारेगाव
मारेगाव- हर घर तिरंगा मोहिमेच्या अंतर्गत नगरपंचायत मारेगावद्वारे काल दि. 5 ऑगस्ट 2025 रोजी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘चालता बोलता प्रश्नमंजुषा’ स्पर्धेचे आयोजन शहरातील फार्मसी कॉलेज येथे करण्यात आले होते.
या स्पर्धेत शहरातील आदर्श हायस्कूल, राष्ट्रीय विद्यालय, विद्यानिकेतन विद्यालय, संकेत महाविद्यालय, कै. दामोदरपंत कन्या शाळा व फार्मसी कॉलेज इत्यादी शाळा/महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उस्फूर्त सहभाग घेतला.
स्पर्धेमध्ये भारताचा स्वातंत्र्यलढा, भारताचा व महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल व राज्यव्यवस्था ह्या विषयातील प्रश्न मुख्याधिकारी शशिकांत मा. बाबर यांच्या मार्फत विचारण्यात आले. सलग तीन प्रश्नांची बरोबर उत्तरे देणाऱ्या स्पर्धकाला मुख्याधिकारी व विभाग प्रमुख यांनी स्वखर्चातून शुद्ध चांदीचे नाणे बक्षीस म्हणून दिले.स्पर्धेत सलग तीन प्रश्नांची अचूक उत्तरे देत आदर्श हायस्कूल मधील सृष्टी ढुमणे व अनन्या पांडे या दोन विद्यार्थिनींनी चांदीचे नाणे पटकावले. स्पर्धेतील सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय हर्षोल्लासात स्पर्धेत भाग घेतला व स्पर्धेस रंजक बनवले.

नगरपंचायतीच्या वतीने हर घर तिरंगा या मोहिमेच्या अंतर्गत राखी बनवण्याची स्पर्धा व सीमेवरील सैनिक तसेच पोलीस कर्मचारी यांच्या प्रति आदर व प्रेम व्यक्त करण्यासाठी पत्रलेखन स्पर्धा अशा स्पर्धांचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे. हर घर तिरंगा मोहिमेंतर्गत स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये देश प्रेम वृद्धिंगत करण्याचा दृष्टिकोन समोर ठेवून कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आलेले आहे.
नगरपंचायत द्वारे नियोजित सर्व कार्यक्रमांमध्ये शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच शहरातील नागरिक, लोकप्रतिनिधी सर्वांनीच उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे व हर घर तिरंगा मोहिमेस यशस्वी बनवावे, असे मी सर्वांना आवाहन करतो.
शशिकांत मा. बाबर (मशप्रसे)
मुख्याधिकारी, न पं मारेगाव


