सुरेश पाचभाई मारेगाव
मारेगाव: तालुक्यातील कापूस व सोयाबिन पिक सध्या एक ते दिड महिन्याचे झालेले असून वाढीच्या अवस्थेत आहे. एकंदरीत वातावरण बघता पिकांवर किड व रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकरिता गावोगावी सभा, मेळावे व शेतीशाळा तसेच सोशल मीडिया च्या माध्यमातून शेतकऱ्यांना कीड व रोग व्यवस्थापण विषयी माहिती तालुका कृषि अधिकारी कार्यालयातील सर्व सहायक कृषि अधिकारी देत आहेत.

परंतु फवारणी करतांना कीटकनाशके सुरक्षितपणे हाताळणी करून सुरक्षा किटचा वापर करूनच फवारणी करावी व होणारे दुष्परिणाम तसेच जिवीत हानी टाळावी असे आवाहन तालुका कृषि अधिकारी दिपाली खवले यांनी केले आहे.फवारणी करतांना खूप जास्त कीटकनाशके, बुरशीनाशके तसेच विद्राव्य खते व टॉनिक एकत्र करून फवारणी करू नये, त्यामुळे रसायनांची कार्यक्षमता कमी होऊन पिकांवर सुद्धा अनिष्ट परिणाम होऊ शकतो.
तसेच केवळ शिफारशीत रसायनांचा वापर फवारणीकरिता करावा असे मंडळ कृषि अधिकारी किशोर डोंगरकार व सुरेश बुटले यांनी स्पष्ट केले. एकात्मिक किड व रोग व्यवस्थापन करिता सबंधित सहायक कृषि अधिकारी यांची मदत घेऊन सुरक्षितरित्या सुरक्षा किट चा वापर करूनच फवारणी करावी असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.


