बेंबळा प्रकल्पाच्या चुकीच्या कामाने शिवणी गाव जलमय
सुरेश पाचभाई मारेगाव
मारेगाव तालुक्यात १५ ऑगस्टच्या सायंकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने शिवणी गावाला अक्षरशः वेढा घातला आहे. शिवणीजवळील बेंबळा प्रकल्पाच्या चुकीच्या कामामुळे कालव्याचे पाणी गावात शिरून अनेक घरांमध्ये दोन ते तीन फुटापर्यंत पाणी साचले. परिणामी गावकऱ्यांच्या घरातील धान्य, अन्नसामग्री व इतर साहित्याचे प्रचंड नुकसान झाले.
बेंबळा प्रकल्पाचे पाणी नाल्याच्या प्रवाहात सोडण्याऐवजी गावाबाहेरील शेतात सोडल्याने बंधारा फुटला आणि पाण्याचा प्रवाह थेट शेतातून गावात घुसला. त्यामुळे गावातील अनेक कुटुंबांनी रात्रभर जागून काढली. विजपुरवठा खंडित झाल्याने अंधारात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.
गावातील गजानन वानखडे, पद्माकर धाबेकर, सदाशिव धोबे, सुधाकर धोबे, घनशाम धोबे, गजानन वैद्य, गुलाब आत्राम, पुरुषोत्तम ढोके, विनोद ढोके, पांडुरंग धोबे, बेबीबाई धोबे,अतुल दुमोरे,मारोती दाते, तुळशीराम धोबे, नंदू धोबे, धनराज धोबे, दिलीप ढोके यांच्यासह अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरले. यात काहींचे घर कोसळल्याची माहिती समोर आली आहे.
नागरिकांनी परस्परांच्या मदतीने घरातील साहित्य बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र शासनाकडून मदत मिळण्यात उशीर झाल्याने ग्रामस्थांमध्ये रोष आहे. दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजता तलाठी यांनी गावाला भेट दिली, पण याशिवाय अन्य कोणताही अधिकारी घटनास्थळी दाखल झाला नव्हता.

ग्रामस्थांनी तातडीने नुकसानग्रस्तांना मदत द्यावी व बेंबळा प्रकल्पाच्या गैरव्यवस्थापनाची चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे.


