आधुनिक शेतीकडे वाटचाल
सुरेश पाचभाई मारेगाव,
मारेगाव तालुक्यातील हिवरी येथे स्वातंत्र्यदिनी (१५ ऑगस्ट) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGA) अंतर्गत १ हेक्टर क्षेत्रावर चिकू फळपीकाची लागवड करण्यात आली. तालुका कृषि अधिकारी दीपाली खवले यांच्या उपस्थितीत शेतकरी श्री. रमेश वासुदेव कळसकर यांच्या शेतात ही लागवड झाली.
या वेळी हवामान अनुकूल सीआरए (CRA) फळबाग लागवड तंत्रज्ञानावर प्रात्यक्षिक घेण्यात आले. या तंत्रज्ञानामुळे मुळांना थेट अन्नद्रव्ये व पाण्याचा पुरवठा होऊन दुष्काळी व माळमाथ्यावरील भागातही झाडांची चांगली वाढ होते, असे प्रतिपादन तालुका कृषी अधिकारी दिपाली खवले यांनी केले.
सहाय्यक कृषि अधिकारी तुषार मेश्राम यांनी सीआरए तंत्रज्ञानाची सविस्तर माहिती दिली. या पद्धतीत २ बाय २ फूट रुंद व २ फूट खोलीचे खड्डे तयार करून त्यात गांडूळ खत, ट्रायकोडर्मा, शेणखत व वाळू टाकून रोपे लावली जातात. खड्ड्याच्या चारही कोपऱ्यात ३ फूट उंच पीव्हीसी पाईप बसवले जातात.

त्याद्वारे पाणी व खते थेट मुळांपर्यंत पोहोचवली जातात. परिणामी झाडांची निरोगी वाढ होऊन उत्पादनात वाढ होते.यावेळी तालुक्यातील शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी शासनामार्फत विविध योजना उपलब्ध असल्याची माहिती देत, या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन कृषी अधिकारी दिपाली खवले यांनी केले.
दरम्यान कपाशी पिकावरील मित्रकिडींबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. क्रायसोपा व लेडी बर्ड बिटल या उपयुक्त कीटकांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून आली आहे. क्रायसोपा एका दिवसात सुमारे ४६ शत्रूकिडींचे भक्षण करते, तर लेडी बर्ड बिटल ४० ते ५० मावा किडी खातो. त्यामुळे शेतकऱ्यांनी मित्रकिडींचे संवर्धन करावे, असा संदेश कृषि सेवक सनद घोसळकर यांनी दिला .
तसेच फवारणी करताना घ्यावयाच्या काळजीबाबत प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले.या कार्यक्रमाला शेतकरी रमेश कळसकर, गणेश कळसकर, प्रदीप नगराळे, गणेश कोवे आदींसह अनेक शेतकरी उपस्थित होते.


