वेगाव येथील 23 वर्षीय तरुणाची आत्महत्या
सुरेश पाचभाई मारेगाव
मारेगाव तालुक्यातील वेगाव येथील एका तरुणाने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना शनिवारी (दि. 16 ऑगस्ट) सायंकाळी घडली. मृत तरुणाचे नाव राहुल शंकर मेश्राम (वय 23) असे असून, तो मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारच्या सुमारास राहुल घरात असताना कीटकनाशक प्राशन केले. घटनेची माहिती समजताच कुटुंबीयांनी तातडीने त्याला मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्याचा सल्ला दिला.

दरम्यान, चंद्रपूरकडे नेत असताना वाटेतच राहुलची हालचाल बंद झाली.त्यामुळे पुन्हा मारेगाव ग्रामीण रुग्णालयात त्याला नेले असता येथील डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे. तरुणाने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुढील तपास ठाणेदार उमेश बेसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय किसन संकुरवार करीत आहेत.
ग्रामीण भागातील वाढत्या आत्महत्या चिंताजनक
यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामीण भागात तरुणांच्या आत्महत्येच्या घटना वाढत चालल्याचे दिसून येत आहे. आर्थिक अडचणी, मजुरीवर आधारित कुटुंबाचा भार, तसेच सामाजिक-मानसिक ताण या कारणांमुळे तरुण आत्मघातकी पावले उचलत असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये आहे.


