सुरेश पाचभाई मारेगाव,
मारेगाव: जीवनविकास विद्यालय, हटवांजरी येथील १७ वर्षीय मुलींच्या कबड्डी संघाने तालुका स्तरावरील कबड्डी स्पर्धेत दमदार कामगिरी करून भक्कम विजय मिळवला असून आता या संघाने जिल्हास्तरीय स्पर्धेत आपले स्थान पक्के केले आहे.
या स्पर्धेत सुरुवातीपासूनच हटवांजरीच्या खेळाडूंनी शिस्तबद्ध व आक्रमक खेळ सादर केला. उत्कृष्ट बचाव आणि चढाईच्या जोरावर त्यांनी प्रतिस्पर्ध्यांना झुंजार प्रत्युत्तर देत अंतिम सामन्यात महात्मा फुले विद्यालय, मारेगाव संघाला पराभूत करत विजय संपादन केला.

संघ कॅप्टन सिमरन कालेकर हिने संघभावना, जिद्द व नेतृत्वगुणांच्या जोरावर विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. खेळाडूंची चपळाई, वेगवान खेळ आणि अचूक डावपेचामुळे प्रेक्षकांनीही संघाचे कौतुक केले. या विजयानंतर गावात आणि शाळेत जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या यशामागे शाळेचे मुख्याध्यापक श्री. मुकेश महाडुळे, क्रीडा शिक्षिका मोघे मॅडम तसेच इतर शिक्षक-कर्मचाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष श्री. कुंदनकुमार महाजन यांनी संघाचे अभिनंदन करत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.


